नंदुरबारात शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:32 PM2019-03-14T12:32:21+5:302019-03-14T12:32:51+5:30
नंदुरबार जिल्हा : १९६ परवानाधारक
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यात एकूण १९६ शस्त्र परवानाधारक असून त्यापैकी २६ जणांनी शस्त्रे जमा केली आहेत.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेषत: शस्त्रे जमा करण्यासाठी परवानाधारकांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण १९६ जणांनी शस्त्रांचे परवाने घेतले आहेत. त्यांनी दोन दिवसात पोलिसांकडे आपली शस्त्रे जमा करावी व निवडणुकीनंतर आठवडाभरात त्यांना त्यांची शस्त्रे परत केली जातील, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले आहे. पहिल्याच दिवशी २६ जणांनी शस्त्रे जमा केल्याची माहितीही त्यांनी दिली. येत्या दोन दिवसात उर्वरित शस्त्रे जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.