पाऊस लांबल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:31 PM2020-07-25T12:31:27+5:302020-07-25T12:31:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या पश्चिमेकडील मैदानी भागात शेतकऱ्यासाठी अन्न व पशुधनासाठी चारा म्हणून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या पश्चिमेकडील मैदानी भागात शेतकऱ्यासाठी अन्न व पशुधनासाठी चारा म्हणून उपलब्ध होणाºया भात पिकाची लागवड सुरू झाली आहे.
यंदा जुलैचा पंधरवडा उलटूनदेखील सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भात लावणी खोळंबली होती. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी उशिरा का होईना भात लागवड सुरू केली आहे. त्यामुळे यंदा भात पिकाच्या उत्पन्नात घट होणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात बहुतेक शेतकºयांकडून पारंपरिक तसेच चारसूत्री पद्धतीचा अवलंब करून भात पीक लागवडीच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. भात पिकापासून पशुधनासाठी चाराही उपलब्ध होत असल्याने भात लागवडीसाठी शेतकºयांची लगबग सुरू आहे. बहुतेक शेतकरी भात वाणात हळवा, निगरवा, गरवा, सुवासिक तसेच संकरित वाणाची लागवड करीत आहेत. यात जया, फुले, समृद्धी, मसुरी, बासमती-३७०, इंद्रायणी, खुशबू, सह्याद्री तसेच गुजरात राज्यात उपलब्ध असलेल्या वाणाचेही उत्पन्न घेण्याकडे कल आहे. मागील काही वर्षापासून परिसरातील शेतकºयांचा फळपिके व इतर नगदी पिके घेण्याकडे कल असल्याने अन्नधान्याच्या पिकांची पेरणी कमी झाली आहे.
शेजारील गुजरात राज्यात शेतीकामासह इतर रोजगारासाठी हंगामी स्थलांतराचे प्रमाण वाढले. कालांतराने भात पीक लावणी ते कापणीपर्यंतची कामे करण्यासाठीच येथील लोकांचे स्थलांतर सुरू झाले. त्यामुळे तेथील पीक लागवड पद्धती आत्मसात करून येथे आल्यावर प्रायोगिक तत्वावर थोड्याफार प्रमाणात भात पिकाची लागवड सुरू केली आहे. परिणामी येथील हवामानात भरघोस पीक येऊ लागल्याने परिसरात दिवसेंदिवस भात पिकाच्या क्षेत्रात वाढ होत गेली. त्यातच तालुका कृषी विभागानेही शेतकºयांच्या पीक पद्धतीचा बदलता कल लक्षात घेऊन शेतकºयांना प्रोत्साहन दिले. कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भात पीक प्रत्यक्षिकाचे उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकरी गटाच्या माध्यमाने चांगल्या प्रतीच्या वाणाची लागवड केल्याने उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. मात्र यंदा पुरेशा पावसाअभावी लागवड उशिरा झाल्याने उत्पन्नात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.