प्रचाराचे विविध फंडे लक्षवेधी : नंदुरबार पालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:29 AM2017-12-04T11:29:25+5:302017-12-04T11:29:34+5:30

Prominent among the funding campaign: Nandurbar Municipality Election | प्रचाराचे विविध फंडे लक्षवेधी : नंदुरबार पालिका निवडणूक

प्रचाराचे विविध फंडे लक्षवेधी : नंदुरबार पालिका निवडणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रचाराचा रंग दिवसेंदिवस चढू लागला आहे. काँग्रेस व भाजपतर्फे विविध ‘फंडे’ वापरले जात आहेत. मतदारांसाठी ही वेगळी अनुभूती आहे. प्रचारासाठी आणखी आठ दिवस शिल्लक असल्यामुळे आणखी कोणत्या नव्या प्रकाराची भर पडेल याकडे शहरवासी लक्ष देवून आहेत.
अर्ज माघारीनंतर सर्वच पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर दिला आहे. गेल्या दोन दिवसांर्पयत प्रचार फेरी, रॅली आणि घरोघरी जावून मतदारांच्या भेटींर्पयत प्रचार मर्यादीत होता. दोन दिवसांपासून मात्र सर्वच पक्षांतर्फे प्रचाराच्या विविध फंडांचा वापर केला जावू लागला आहे. त्यासाठी खास इव्हेंट एजन्सी देखील नेमलेल्या आहेत. 
यंदा थेट नगराध्यक्ष निवडणूक असल्यामुळे पालिका निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. शिवाय नंदुरबारात दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्यांच्याकडून प्रचारात कुठलीही कसर सोडली जात नसल्याचे चित्र आहे. जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्यासाठी विविध प्रकार प्रचार केला जात आहे. त्यासाठी चार एजन्सी इतर शहरातून मागविण्यात आलेल्या आहेत. त्यांनाच प्रचाराचे सर्व नियोजन देण्यात आलेले आहे.
वासुदेवाची स्वारी देखील गल्लीबोळात फिरून त्या त्या पक्षाचे प्रचार करीत आहेत. काँग्रेस व भाजपने प्रत्येकी एक पथक आणले आहे. त्यात सात ते आठ जणांचा समावेश असून एका पथकातील प्रत्येकी चार जणांचे गट विभागून ते विविध भागात पक्ष आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत.
कला पथक आणि कव्वाली
काँग्रेस व भाजपने कला पथके देखील आणली आहेत. शहरातील विविध भागात ही पथके जावून पक्ष आणि उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. काँग्रेसच्या पथकातर्फे शहराच्या विकासावर भर दिला जात आहे तर भाजपच्या पथकातर्फे गैरव्यवहार आणि करण्यात येणारी कामे यावर भर आहे.
याशिवाय काँग्रेसतर्फे कव्वाली पथक देखील आणण्यात आले आहे. शहरातील विविध भागात फिरून हे पथक कव्वालीद्वारे प्रचार करीत आहेत.
सायकल रिक्षा आणि रथ
भाजपने प्रत्येक प्रभागनिहाय एक सायकलरिक्षा तयार केली आहे. त्यावर चारही बाजूंनी पक्ष आणि उमेदवाराचे फलक लावण्यात आले असून आतमध्ये स्पिकर ठेवून त्यात प्रचाराचे गाणे वाजविले जात आहे. काँग्रेसने विकास कामांची माहिती देणारा रथ तयार केला आहे. याशिवाय दोन्ही पक्षातर्फे एलईडी स्क्रिनच्या सहाय्याने केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण, योजना समजवून सांगितल्या जात आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचाही प्रचार आणि त्यांचे आवाहन या स्क्रिनवर दाखविले जात आहे.
शहरातील विविध इमारतींवर लावण्यात आलेले फुगे देखील लक्ष वेधून घेत आहेत. पक्ष, उमेदवार यांचा प्रचारासाठीचे हे फुगे अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी समोरासमोर लावले आहेत.
प्रचाराच्या पुढच्या टप्प्यात आणखी काही नवीन प्रकार दोन्ही पक्षांतर्फे आणले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने नियोजन देखील सुरू असल्याचे सांगण्यात आले.
नेहमीप्रमाणे ध्वनीक्षेपक लावलेल्या रिक्षा देखील गावात ठिकठिकाणी फिरत आहेत. प्रचार रॅली, प्रचार फेरी यांचीही रेलचेल आहेच.
 

Web Title: Prominent among the funding campaign: Nandurbar Municipality Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.