माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा : डॉ. वर्षा फडोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:15+5:302021-09-23T04:34:15+5:30
बामखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान व भारताच्या अमृत महोत्सवी ...
बामखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान व भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशनतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डाॅ. फडोळ यांनी सांगितले की, वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण, सांडपाणी आणि घन कचऱ्याचे व्यवस्थापन, पाणी अडविणे व जिरविणे, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून वायू प्रदूषण टाळावे. तसेच सौर ऊर्जा, बायोगॅस यासारख्या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करावी. तसेच ग्रामस्थांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व देऊन आरोग्यमान उंचवावे असे आवाहनही डॉ. फडोळ यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. फडोळ यांनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष मंदिर परिसरात नैसर्गिक झऱ्यावर बांधण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्यावर श्रमदान केले. वृक्ष मंदिर येथे भेट देऊन लोकसहभागातून लावण्यात आलेल्या विविध वृक्षांची पाहणी करून त्यांची अद्ययावत माहिती दप्तरी कशी ठेवावी याविषयी मार्गदर्शन केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडोळ यांनी ग्रामस्थांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणासाठी व स्वच्छतेची शपथ दिली. गावातून वृक्ष लागवड व स्वच्छता याविषयी जनजागृती व्हावी यासाठी स्थानिक कलावंतांच्या सहाय्याने स्वच्छता फेरी काढण्यात येऊन शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सरपंच मनोज चौधरी, विस्तार अधिकारी मनोज देव, ग्रामसेवक मनीष रामोळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, जिल्हा कक्षातील विशाल परदेशी, युवराज सूर्यवंशी आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.