बोगस बियाणे, खतांवर नियंत्रणासाठी गुणवत्ता नियंत्रण पथकांची राहणार नजर
By मनोज शेलार | Published: April 6, 2023 05:28 PM2023-04-06T17:28:26+5:302023-04-06T17:28:43+5:30
१ एप्रिलपासून भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत.
नंदुरबार : आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली आहे.
१ एप्रिलपासून भरारी पथके कार्यान्वित झाली आहेत. जिल्हास्तरावर नियंत्रक तथा परवाना अधिकारी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे भरारी पथकाचे प्रमुख असतील. पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून तर उपविभागीय कृषी अधिकारी, नंदुरबार व शहादा, मोहीम अधिकारी व निरीक्षक वजनेमापे हे जिल्हास्तरीय सदस्य असतील.
तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून, तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून, कृषी अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषी अधिकारी हे सदस्य असतील.