मोलगीत समृद्धीसाठी राणी दिवाळीला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:00 PM2020-01-25T13:00:55+5:302020-01-25T13:01:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐतिहासिक परंपरा असलेली गावदिवाळीचा उत्सव मोलगी ता.अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऐतिहासिक परंपरा असलेली गावदिवाळीचा उत्सव मोलगी ता.अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आपली संस्कृती जपवुन ठेवण्यासाठी व पुढच्या पिढीतदेखील आपल्या संस्कृतीचे बीज पेरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गावात सुख-समृद्धी नांदावी यासाठी मोलगी येथील गावकऱ्यांनी निसर्ग देवतेला साकडे घातले.
आदिवासी बांधवांचे सण हे आदिवासी संस्कृतीप्रमाणेच वेगळे असून मानवाला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत. पहिल्या सारखे आदिवासी आता विखुरलेल्या स्थितीत राहिलेला नाहीत. त्यांनी आता आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहेत. विविध स्तरावर नानाविध भूमिका बजावत आहेत. परंतु आजच्या आधुनिक युगातदेखील आपली हजारो वर्षांची परंपरा, रूढी, संस्कृती जपून त्यानुसार अजूनही सण, उत्सव साजरे केले जात आहेत, तसे मोलगी येथेही साजरी होत आहे. गावदिवाळी हा अशाच एका उत्सवाचा भाग आहे. काळात आयोजित केला जात असतो. मौखिक मान्यतेनुसार धातुयुगाच्या पूर्वीपासून गाव दिवाळी साजरी केली जात आहे. पूजा करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी पीठ व तेलाची मागणी करून गावभर फिरल्यावर देवस्थानाच्या ठिकाणी पूजा केली जात असते. भागतद्वारे नवस फेडून सुख शांती मागितली जाते. गावातील लोकांचे पीकपाणी चांगले राहू दे, पाऊस चांगला पडू दे अशा पद्धतीने मागणी मागितले जाते. गाव दिवाळीचा सण गावात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. हजारो वर्षांची परंपरा जपून ठेवल्याबद्दल गावकऱ्यांमध्येही रास्त अभिमान आहे.
राणी दिवाळीचा जन्म डाब राजमंडल म्हणजेच दाब या गावी झाला. गांडा ठाकूर या राजाची बायको असलेली दिवाळी ही पोरोब देवाची मुलगी असून आईचे नाव आठा डुंगर असल्याचे म्हटले जात आहे. राणी दिवाळीबाबत अशी मान्यता आहे की, आदिवासी समाज हा पूर्वी जंगलात राहून उपजीविका करीत असे त्यांना वाघ, सिह, अस्वल या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असे हे राणी दिवाळीला समजले असावे असा अंदाज काही पूर्वजांचा आहे. तेव्हापासून या पशूंना आनंदी ठेण्यासाठी राणी दिवाळीने हातात झाडू घेऊन ताटात एक सोन्याचा दिवा, बाली, पायात घुंगरू बांधून नाचू लागली. तेव्हापासून या आदिवासी बांधवाना जंगली जनावरांचा त्रास कमी होऊ लागला तेव्हापासून ते आतापर्यंत राणी दिवाळीचे अनुकरण समाजबांधव करीत आहे.