मिरची पथारींचा जागेचा प्रश्न पुन्हा आला ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:10 PM2018-10-27T12:10:48+5:302018-10-27T12:10:57+5:30
जागेची शोधाशोध : स्थानिक रहिवाशांचा वाढता विरोध
नंदुरबार : मिरची हंगाम सध्या जोमात सुरू झाला आहे. परंतु यंदा मिरची खरेदी-विक्री आणि पथारींसाठी जागेची अडचण निर्माण होत आहे. वर्षानुवर्ष ज्या भागात मिरची पथारी होत्या त्या भागात रहिवास वस्ती वाढली आहे. मोठे दवाखाने आणि व्यापारी संकुल देखील उभे राहिले आहेत. त्यामुळे मिरची पथारी हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. व्यापा:यांतर्फे उमर्दे शिवार किंवा भोणे शिवारातील शेतांमध्ये पथारी सुरू करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.
मिरची पथारी शहराबाहेर हलवाव्या अशी मागणी गेल्या तीन ते चार वर्षापासून होऊ लागली आहे. आता या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे यंदा मिरची पथारी शहराबाहेर जातील अशी शक्यता असतांना अनेक व्यापा:यांनी पूर्वीच्या ठिकाणी ते सुरू केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे.
तीन दशकांपासूनची जागा
सध्या जेथे मिरची पथारी सुरू आहेत ती जागा तीन ते चार दशकांपासून पारंपारिक पद्धतीने कायम आहे. काही व्यापा:यांनी विकत घेवून तर काहींनी भाडय़ाने जागा घेवून मिरची पथारी तेथे सुरू केल्या होत्या. पूर्वी ही जागा म्हणजे शहरापासून लांब अंतरावरची जागा मानली जात होती. परंतु शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या यामुळे मिरची पथारीपुढे दोन ते तीन किलोमिटरअंतरार्पयत रहिवास वस्ती वाढली आहे. पथारीच्या आजूबाजू मोठय़ा प्रमाणावर वसाहती निर्माण झाल्या आहेत. वळण रस्त्यामुळे आणि पालिकेने केलेल्या डी.पी. रस्त्यांमुळे रहिवासी वस्ती वाढल्या आहेत.
शेकडो एकरवर..
शेकडो एकरवर मिरची पथारी आहे. त्यामुळे हजारो क्विंटल मिरची अशा ठिकाणी वाळत टाकली जाते. उष्णता, हवा यामुळे अंगाची काहिली होत असते. लहान मुले, वृद्ध व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागतो. वळण रस्ता असल्यामुळे भरधाव जाणा:या वाहन चालकांच्या डोळ्यात हवेमुळे मिरचीचे अंश जावून अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शिवाय परिसरात असलेल्या मोठय़ा रुग्णालयांमधील रुग्णांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
शहराबाहेर जागा
मिरची पथारींना जागा देतांना आता थेट शहराबाहेर जागा द्यावी अशी मागणी आहे. दोंडाईचा, निझर मार्केटने देखील शहराबाहेर जागा दिलेली आहे. जेणेकरून रहिवाशांना त्याचा त्रास होणार नाही. गेल्यावर्षी भालेर रस्त्याला उमर्दे शिवारात जागा शोधण्यात आली होती.
काही व्यापा:यांनी भोणे शिवारात देखील जागा शोधली होती. परंतु त्या ठिकाणी पथारी न लावता पुन्हा नेहमीच्याच ठिकाणी पथारी लावण्यात आली आहे.