होराफळी येथे अवैध दारू कारखान्यावर धाड, साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 12:18 PM2021-01-25T12:18:46+5:302021-01-25T12:20:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : होराफळी, ता.अक्कलकुवा येथे अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने पाच लाख ५३ हजार ३०० ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : होराफळी, ता.अक्कलकुवा येथे अवैध दारू कारखान्यावर धाड टाकून एलसीबीने पाच लाख ५३ हजार ३०० रुपयांचे अवैध दारू व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी गुजरातमधील एकाविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिषभाई छगनभाई वसावा, रा.वडफलीय, ता.डेडीयापाडा, जि.नर्मदा (गुजरात) असे संशयीताचे नाव असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना होराफळी येथे अवैध दारू बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. होराफळी येथील एका झोपडीत हा कारखाना सुरू असल्याचे समजल्यावर पथकाने त्या ठिकाणी गोपनियरित्या जाऊन माहिती काढली. त्यानंतर अक्कलकुवा येथून दोन खाजगी पंचांना घेत पथकाने थेट त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली.
या झोपडीमध्ये गोवा व्हिस्कीचे ७३ पुठ्ठ्याचे बॅाक्स, १८० मि.ली. मापाच्या ५० प्लॅस्टिकच्या बाटल्या व इतर बाटल्या असे एकुण चार हजार ३० बाटल्या व त्यामधील व्हीस्की त्यांची किंमत पाच लाख २३ हजार ९०० रुपये. याशिवाय रॅायल व्हिस्की नावाचे पाच खोके व त्यातील २८० बाटल्या त्यांची किंमती २९ हजार ४०० रुपये असा एकुण पाच लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक मनोज सुदान नाईक यांनी फिर्याद दिल्याने मनिषभाई वसावा याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश तावडे, बापू बागूल, विशाल नागरे, सतिष घुले यांनी केली. या कारवाईमुळे या भागात खळबळ उडाली आहे.