पुण्याने जागा दिली तरच नंदुरबारवरुन रेल्वे सुरु होईल : खासदार डॉ. हीना गावीत
By भूषण.विजय.रामराजे | Published: February 27, 2023 07:39 PM2023-02-27T19:39:31+5:302023-02-27T19:42:10+5:30
पुणे महानगरासाठी रेल्वेगाडी सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतू पुणे रेल्वेस्थानकात जागाच नसल्याने नंदुरबारवरुन रेल्वे सुरु करता येत नसल्याची माहिती रेल्वेच्या पश्चिम विभागाचे महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी दिली.
नंदुरबार- पुणे महानगरासाठी रेल्वेगाडी सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतू पुणे रेल्वेस्थानकात जागाच नसल्याने नंदुरबारवरुन रेल्वे सुरु करता येत नसल्याची माहिती रेल्वेच्या पश्चिम विभागाचे महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी दिली. नंदुरबार रेल्वेस्थानकात दिलेल्या भेटीप्रसंगी खासदार डॉ. हीना गावीत आणि सल्लागार समिती सदस्य यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. महाप्रबंधक अशोककुमार मिश्रा यांनी सोमवारी नंदुरबार रेल्वेस्थानकात भेट दिली.
यावेळी त्यांच्यासोबत डीआरएम नीरज वर्मा उपस्थित होते. महाप्रबंधक मिश्रा यांच्या बैठकीबाबत रेल्वे प्रवाशांमध्ये उत्सुकता होती. यात नंदुरबार ते पुणे रेल्वेगाडीला हिरवा कंदील मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू या अपेक्षेची पूर्तता यंदाही झालेली नाही. महाप्रबंधक मिश्रा, डीआरएम वर्मा यांनी सकाळी नंदुरबार रेल्वेस्थानकाला भेट दिल्यानंतर स्थानकाची पाहणी केली.
यावेळी स्थानकात नव्याने निर्माण करण्यात आलेले दोन ट्रॅकची माहिती घेण्यात आली. या पाहणीनंतर दोघा अधिकाऱ्यांची खासदार डॉ. हीना गावीत यांनी भेट घेतली. यावेळी रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या बाजूला प्लॅटफाॅर्म तयार करण्याबाबत चर्चा झाली, यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती महाप्रंबधक मिश्रा यांनी दिली.
प्रवाशांसाठी लिफ्ट मंजूरनंदुरबार रेल्वेस्थानकात सरकता जिना देण्याची मागणी होती. रेल्वेने त्याऐवजी लिफ्टला मंजूरी दिली असून लवकरच त्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ, लहान मुले व महिलांची सोय होणार आहे.
दरम्यान, खासदार डॉ. गावीत यांनी ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी बॅटरी गाडी देण्याची तयारी दर्शवली, परंतू यावर निर्णय होवू शकलेला नाही.पुणे नाही दिली पण मग दिल्ली तरी द्यापुण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी देण्याबाबत रेल्वेचे महाप्रबंधकांकडून हिरवा कंदील देण्यात आली नसली तरी दिल्लीसाठी स्वतंत्र गाडी देण्याची मागणी यावेळी सल्लागार समितीने केली आहे. ही गाडी भुसावळ मार्गाने सुरु व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याबाबत निर्णय होणार असल्याचे अशोककुमार मिश्रा यांनी सांगितले.