पावसाची सरासरी 30 टक्के तूट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:00 PM2018-09-30T13:00:09+5:302018-09-30T13:00:15+5:30
यंदा अवघा 67 टक्के पाऊस : आज पावसाळ्याचा शेवटचा दिवस, धडगावने गाठली सरासरी
नंदुरबार : यंदा पावसाने नंदुरबार जिल्ह्यावर अवकृपाच केली आहे. पावसाळ्याचे चार महिने रविवारी संपणार आहेत. अधिकृत पावसाळा देखील संपणार आहे. असे असतांना यंदा सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची 30 टक्के तूट यंदा कायम राहणार आहे. गेल्या 16 वर्षातील यंदा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झालेली आहे. परतीचा पाऊस आला तरी त्याचा फारसा उपयोग आता होणार नाही. दरम्यान, आतापासूनच अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.
नंदुरबार जिल्ह्याची एकुण पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. गेल्या चार वर्षाचा विचार करता केवळ गेल्यावर्षीच पावसाने सरासरीची नव्वदी गाठली होती. यंदा राज्यभरात सर्वत्र पावसाचे प्रमाण समाधानकारक आणि सरासरीच्या तुलनेत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु नंदुरबारवर मेघराजाने पाठ फिरविल्याने पावसाळ्याच्या चारही महिन्याची सरासरी देखील गाठता आली नसल्याचे चित्र आहे.
यंदा संपुर्ण चार महिन्यात नियमित आणि अपेक्षीत पाऊसच झाला नाही. जून महिन्यात तिस:या आठवडय़ात पावसाने हजेरी लावली. पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पेरण्यांना सुरुवात झाली. त्यानंतर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. सर्वत्र सारखा पाऊसच झाला नाही. नदी, नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. त्याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. खरीपातील पिकांची उत्पादकता 30 ते 35 टक्क्यांनी घटणार तर आहेच परंतु रब्बी हंगाम देखील जेमतेमच राहणार असल्याचे दिसून येत आहे.
16 वर्षातील सर्वात कमी नोंद
जिल्ह्यात 2002 मध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर्षी सरासरीचा 60 ते 65 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मेपेक्षा अधीक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. विरचक प्रकल्पही पुर्ण झालेला नसल्यामुळे नंदुरबार शहराला तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत होता. खरीपाप्रमाणेच रब्बीचाही हंगाम आला नव्हता. यंदा देखील 2002 च्या दुष्काळाचीच पुनरावृत्ती दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच नियोजन करून दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे.
सर्वात कमी नवापूर, नंदुरबार
यंदा सर्वात कमी पाऊस नवापूर व नंदुरबार तालुक्यात नोंदला गेला आहे. नवापूर तालुक्यात सरासरीचा केवळ 56 तर नंदुरबार तालुक्यात सरासरीचा 59 टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यता सरासरीचा 92 टक्के नोंदला गेला आहे. इतर तालुक्यांमधील स्थिती देखील समाधानकारक नाही. शहादा व तळोदा तालुक्यात सरासरी 68 तर अक्कलकुवा तालुक्यात 64 टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील भाग नेहमीच अवर्षणप्रवण राहिला आहे. गेल्या सहा वर्षापासून पूव्रेकडील शनिमांडळ, रनाळा, कोपर्ली, कोळदा, खोंडामळी मंडळात सरासरीचा 50 ते 65 टक्के पाऊस होत आहे. या वर्षी रनाळा, कोपर्ली व शनिमांडळ मंडळात 30 त 35 टक्के सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांची वाढ आधीच खुंटली होती. परिणामी उत्पादकता निम्म्यार्पयत येणार आहे. पीके तर हातून गेलीच आता पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट या भागातील गावांवर ओढावणार आहे. त्यामुळे शेतकरी आतापासूनच हवालदिल झाला आहे.जिल्ह्यात 2015 मध्ये सरासरीचा 70 टक्के पाऊस झाला होता. एकुण पावसाळ्यात अवघे 33 दिवस पावसाचे होते. त्यात नंदुरबार तालुक्यात 61.57 टक्के पाऊस झाला होता. पावसाचे दिवस अवघे 33 होते. नवापूर तालुक्यात 53 टक्के पाऊस होऊन 33 दिवस पावसाचे होते. शहादा तालुक्यात 70 टक्के पाऊस होऊन 31 दिवस पावसाचे होते. तळोदा तालुक्यात 84 टक्के पाऊस होऊन 40 दिवस पावसाचे तर धडगाव तालुक्यात 84 टक्के पाऊस होऊन 34 दिवस पावसाचे होते.
जिल्ह्यात 2016 हे वर्ष पावसाच्या दृष्टीने समाधानकारक होते. या वर्षी 50 दिवस पावसाचे होते. शिवाय सरासरीचा 81 टक्के पाऊस झाला होता. त्यात नंदुरबार तालुक्यात 39 दिवस पावसाची नोंद होती. सरासरी 83 टक्के पाऊस नोंदला गेला. नवापूर तालुक्यात 73 टक्के पाऊस झाला होता. 48 दिवस पावसाचे होते. शहादा तालुक्यात सर्वात कमी अर्थात 63 टक्के पाऊस झाला. 33 दिवसच पावसाचे होते. तळोदा तालुक्यात 91 टक्के पाऊस झाला होता. 51 दिवस पावसाचे होते. अक्कलकुवा तालुक्यात 71 टक्के सरासरी पाऊस झाला. 57 दिवस पावसाचे होते तर धडगाव तालुक्यात 112 टक्के पाऊस होऊन 72 दिवस पावसाचे होते
जिल्ह्यात 2017 मध्ये देखील तब्बल 94 टक्के पावसाची नोंद झाली होती. 54 दिवस पावसाचे नोंदले गेले होत. सर्वाधिक पाऊस अक्कलकुवा तालुक्यात 111 टक्के झाला होता. नंदुरबार तालुक्यात 55 दिवस पाऊस होऊन 73 टक्के सरासरी पावसाची नोंद झाली होती. नवापूर तालुक्यात 48 दिवस पाऊस होऊन 84 टक्के पावसाची नोंद होती. शहादा तालुक्यात 45 दिवस पाऊस होऊन 79 टक्के पाऊस नोंदला गेला होता. तळोदा तालुक्यात 101 टक्के पाऊस होऊन 50 दिवस पावसाचे होते. अक्कलकुवा तालुक्यात 111 टक्के पाऊस नोंद होऊन सर्वाधिक 74 दिवस पावसाचे होते. तर धडगाव तालुक्यात 103 टक्के नोंद होऊन 52 दिवस पावसाचे होते. गेल्या 16वर्षात या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.