प्रतिमा उंचावली, पण गुन्हेगारीवर वचक नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:18 AM2020-09-17T11:18:02+5:302020-09-17T11:21:22+5:30
मनोज शेलार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना काळातील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यात पोलीस दलाला यश आले. कोरोनाच्या ...
मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना काळातील सण, उत्सव शांततेत पार पाडण्यात पोलीस दलाला यश आले. कोरोनाच्या काळात नागरिकांना शिस्त लावण्यासाठी कारवायाही झाल्या त्याचेही स्वागत करण्यात आले. परंतु दुसरीकडे गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात मात्र ढिलाई झाल्याचे चित्र आहे. नंदुरबारातील दरोडा, खून, चोरीचे सत्र रोखण्यात पोलिस दलाची दमछाक होतांना दिसून येत आहे. या गंभीर गुन्ह्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे. आता बंदोबस्ताचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासाकडे गांभिर्याने पाहिले जाईल अशी सर्वसामान्य जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.
कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यांच्या काळातील पोलिसांची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. लॉकडाऊनमध्ये जिल्ह्याच्या सिमांवर केलेली निगराणी, आंतरराज्य सिमेवरील दक्षता यामुळे कोरोनाच्या सुरवातीच्या काळात रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यात जेवढे जिल्हा प्रशासनाचे यश होते त्यात निम्मे वाटा पोलिसांचा देखील होता यात कुणाचे दुमत राहणार नाही. गेल्या तीन महिन्यापासून शिथील झालेले लॉकडाऊन आणि याच काळात आलेले विविध सण, उत्सव या काळात देखील पोलिसांची भुमिका कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चांगली राहिली. नागरिकांनी, विविध धर्मातील लोकांनी देखील पोलिसांच्या विनंतीला मान देऊन उत्सव मर्यादेत साजरा केले. एकीकडे पोलिसांची अशी चांगली कामगिरी असतांना दुसरीकडे मात्र गुन्हे रोखण्यात फारशी समाधानकारक स्थिती नसल्याचेच चित्र आहे.
नंदुरबारात पडलेला दरोडा, दररोज होणाऱ्या चोरीच्या घटना, धडगाव व नंदुरबार तालुक्यातील खुनाच्या घटनांमुळे सर्वसामान्यांच्या मनातील भिती मात्र कायम आहे. नंदुरबारातील दरोड्याचे धागेदोरे लागलीच पोलिसांना मिळालेले असतांना देखील मुख्य संशयीतांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. दोन पथके राजस्थान व गुजरातमध्ये पाठवूनही काही हाती आले नाही. १६ लाखाची रक्कम घेऊन संशयीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून मजा मारत आहेत. तरीही तपासाबाबत मात्र हवेत तीर मारणे सुरूच आहे. चोरीच्या घटना देखील थांबलेल्या नाहीत. नंदुरबार, शहादा, अक्कलकुवासह जिल्ह्यातील इतर भागातील चोरीच्या घटना सुरूच आहेत. काही भरदिवसा तर काही रात्रीच्या घटना आहेत. वाहन चोरी झाल्याचा एकही दिवस टळत नाही. त्यातील आरोपींना देखील पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. धडगाव तालुक्यातील खुनाचा गुन्हा परंतु म्हसावद पोलिसात दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयीतांना सोडून मनोरुग्णाला पकडल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केलेला आहे. नंदुरबारात किरकोळ कारणातून झालेल्या खुनाची घटना भितीचे वातावरण निर्माण करणारी आहे.
एकीकडे ग्रामिण भागातील आणि शहरातील वाहनचालकांना किरकोळ कारणावरून छळले जात आहे. ग्रामिण भागात एस.टी.बससेवा नसल्याने नागरिक दवाखाना, बाजारहाट, शेती साहित्य खरेदी, बँकांमध्ये येण्यासाठी खाजगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतात. परंतु त्यांच्यावरही थेट कारवाईचे सत्र आहे. ज्यांच्याकडे खाजगी वाहन नाही त्यांनी आपल्या गावातून शहरात पायी यावे काय? असा संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. वाहतूक पोलिसांना तर केवळ टार्गेट पुर्ण करण्यासाठी रस्त्यांवर उभे केले जाते की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
एकुणच पोलिस दलाची प्रतिमा कोरोना काळात उंचावली होती. परंतु घडलेले आणि घडणारे गुन्हे, त्यांचा तपास, आरोपींना अटक यासह सर्वसामान्य वाहनचालकांना छळवणुकीचे प्रकार यामुळे मात्र पोलिस दलाविषयी नाराजीची भावना वाढीस लागली आहे. ती दूर व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांनी आपल्या कडक शिस्तीची जाणीव पुन्हा एकदा करून द्यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जिल्हावासीयांची आहे.