पावसातील खंड वाढवतोय चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 04:33 PM2018-08-04T16:33:26+5:302018-08-04T16:35:09+5:30
सन २००७ पासूनची स्थिती : खान्देशातील कोरड्या दिवसांचा आढावा, धुळे प्रथम स्थानी
- संतोष सूर्यवंशी
नंदुरबार : खान्देशात पावसाचा खंड पडलेल्याने साहजिकच कोरड्या दिवसांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या अकरा वर्षांच्या कालखंडात तब्बल ६७८ दिवस हे कोरडे गेले आहेत. त्यात, जळगाव व धुळे जिल्ह्यात कोरड्या दिवसांची स्थिती ही अनुक्रमे ७५७ व ८२२ इतकी आहे. खान्देशात कमी पावसामुळे पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही़ उन्हाळ्याच्या झळा सोसल्यानंतर पावसाच्या सरी सुखावतील अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षा होती़ परंतु पावसात खंड पडलेला असल्याने या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे़ अकरा वर्षातील कोरड्या दिवसांचा आढावा घेतला असता, त्यांच्या संख्येत वर्षागणिक असमानता दिसून येतेय़ पर्जन्यमानाचा विचार करता खान्देशासाठी २०१३ हे वर्ष सुखावह ठरले होते़ या वर्षी कोरड्या दिवसांची संख्या सर्वाधिक कमी होती़ जळगाव ३१, धुळे ४५ तर नंदुरबार २९ कोरडे दिवस होते़ त्या तुलनेत २०१५ या वर्षात सर्वाधिक कोरडे दिवस नोंदविले गेले़ साहजिकच हे बदलल्या पर्यावरणीय बदलांचे द्योतक असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
का पडलाय पावसात खंड?
मान्सून ट्रफ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाजवळ घोंगावत आहेत़ हवेचा दाब कमी झालेला असल्याने परिणामी वातावरणीय अडथळे निर्माण होऊन बाष्पयुक्त ढगांना दक्षिणेकडे येण्यास मार्ग नसल्याने परिणामी पावसात मोठा खंड पडलेला असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. नाशिकचा पूर्व भाग, कोकण व विदर्भाचा बहुतांश भाग त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भागात काही ठिकाणी तुरळक पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे़ परिणामी कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील १३६ तालुक्यांचे पर्यंजन्यमान खालावले
४पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी पर्यावरणीय बदलांबाबत महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील १३६ तालुक्यांमध्ये पर्जन्यमान खालावले आहे़ १९७२ मध्ये यात ८४ तालुके तर २०१२ मध्ये १२२ तालुके समाविष्ठ होते, अशी माहिती डॉ़ साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ संबंधित तालुक्यांमध्ये ‘ड्रायस्पेल’ म्हणजेच पावसाळ्यातील कोरडा कालखंड वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जगातील १४५ देशांपैकी ५५ देशांकडून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे़ हा प्रयोग सफलही होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याबाबत विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कोरडे दिवस म्हणजे काय?
दिवभरात २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास तसेच सलग सात दिवस २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास त्याला खगोलीय भाषेत ‘ड्रायस्पेल’ असे म्हटले जात असते़ तसेच याअंतर्गत मोडल्या जाणाऱ्या दिवसांना कोरडे दिवस असे म्हटले जात असते़
२००७ पासून वर्षनिहाय
कोरडे दिवस
वर्ष जळगाव धुळे नंदुरबार
२००७ ६५ ७२ ६१
२००८ ६९ ७३ ७०
२००९ ९९ ८९ ८०
२०१० ५१ ५८ ५२
२०११ ६४ ६३ ६६
२०१२ ७६ ८६ ५८
२०१३ ३१ ४५ २९
२०१४ ८३ ८५ ६७
२०१५ ९७ १०४ ९९
२०१६ ६२ ६८ ४२
२०१७ ६० ७९ ५४
एकूण- ७५७ ८२२ ६७८