राजविहीर ग्रामपंचायतीचा दारूबंदी व बॅण्ड न वाजविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 01:01 PM2021-01-28T13:01:26+5:302021-01-28T13:01:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील राजाविहीर ग्रामपंचायतीने संपूर्ण दारूबंदीबरोबरच विविध कार्यक्रमांमध्ये बॅण्ड न वाजविण्याच्या ठराव एकमताने केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील राजाविहीर ग्रामपंचायतीने संपूर्ण दारूबंदीबरोबरच विविध कार्यक्रमांमध्ये बॅण्ड न वाजविण्याच्या ठराव एकमताने केला आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. या निर्णयाचे जो उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. दरम्यान या निर्णयाची प्रभावी अंमलबजाणीसाठी ग्रामस्थांनी तळोदा पोलिसांना निवेदन दिले आहे.
तळोदा तालुक्यातील राजविहीर ग्रामपंचायतीची सभा पंचायत समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नागरिक सतीश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य सोनी रोहिदास पाडवी, सरपंच लहू पाडवी, तंटामुक्तचे अध्यक्ष प्रवीण पाडवी, ग्रामपंचायत सदस्या शारदा पाडवी, गावकारभारी पुंजऱ्या पाडवी, पोलीसपाटील अजबसिंग पाडवी, यशवंत पाडवी, ग्रामसेवक ए.डी. वसावे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर व्यसनाधीनतेवर चर्चा होऊन गावात कोणीही मादक द्रव्य व दारू सेवन करू नये. व्यसनाधीनतेपायी अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारूबंदी करण्यात यावी, असे ग्रामस्थ व महिलांनी सूचविले. याशिवाय आपल्या रूढी-परंपराच जतन करून बँडमुळे ग्रामस्थांना जो त्रास होतो त्यावरदेखील प्रतिबंध आणावा. विविध कार्यक्रमप्रसंगी बँडऐवजी ढोल वाजवावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसा ठरावदेखील ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयाचे उल्लंघन करेल त्याचाविरोधात कायदेशीर कारवाईसह दंड वसूल करण्यात यावा, असेही ठरविण्यात आले. दरम्यान निर्णयाची प्रभावीपणे अंमलाबजावणी करण्यासाठी ग्रामस्थांनी तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांना निवेदन दिले . विशेषत: गावातील संपूर्ण दारूबंदीबाबत महिलांनी प्रभावी अंमलबाजावणी करण्याचा आग्रह अधिकाऱ्यांनी केला आहे.