तळोद्यातील सर्वच बँकांचे एटीएम सुरक्षा रक्षक नसल्याने ‘रामभरोसे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:49 PM2019-07-07T12:49:23+5:302019-07-07T12:49:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी अक्कलकुवा येथे बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला होता. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी अक्कलकुवा येथे बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न चोरटय़ांनी केला होता. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी रक्कम वाचली. ही घटना घडली असतानाही तळोद्यातील सर्वच एटीएम मशीनवर संबंधित बँकांनी पहारेकरी ठेवलेले नाही. त्यामुळे या यंत्रांची सुरक्षा रामभरोसे आहे. रात्रीची पेट्रोलिंग करताना कधी-कधी पोलिसांनाच याठिकाणी पहारा करावा लागतो. सुरक्षेबाबत संबंधित बँकांचे बेफिकीरीचे धोरण दिसते. वरिष्ठ अधिका:यांनी तरी सुरक्षेबाबत ठोस कार्यवाही करावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे.
तळोदा शहराबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी स्टेट बँक, बडोदा बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, हस्ती बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, शहादा पीपल्स बँक अशा सात बँकांनी आपापल्या शाखेच्या ठिकाणी एटीएम मशीन कार्यान्वित केले आहे. या एटीएम यंत्रांद्वारे ग्राहकांना रोख रक्कम उपलब्ध होते. काही एटीएम वगळता इतरांकडून नियमित रक्कम उपलब्ध केली जाते. मात्र सर्वच एटीएम मशीनवर बँकांनी सुरक्षा रक्षक नेमल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाअभावी एटीएम यंत्रांची सुरक्षा एकप्रकारे रामभरोसे आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने सायंकाळी सात-आठ वाजेनंतर तेथे कुलूप लावले जात असल्याचे म्हटले जाते. 24 तास ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा असताना केवळ सुरक्षा रक्षकाअभावी ग्राहकांना रात्री-पहाटे पैसे काढता येत नसल्याचा आरोप आहे.
वास्तविक गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी रात्री अक्कलकुवा येथील परदेशी गल्लीतील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न चोरटय़ांनी केला होता. विशेष म्हणजे चोरटय़ांनी सुसज्ज हत्यारेही सोबत आणले होते. परंतु अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी खुशाल माळी व मुकेश तायडे यांच्या सतर्कतेमुळे चोरटय़ांचा प्रयत्न अयशस्वी झाला. साहजिकच या एटीएम मधील मोठी रक्कमही वाचली. मात्र चोरीच्या या घटनेतून तळोदा शहरातील विविध बँकांच्या वरिष्ठ प्रशासनाने अजूनही धडा घेतलेला नाही. त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे एटीएम यंत्रांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यांनी घेतलेल्या उदासिनतेमुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अक्कलकुवा येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर एटीएम यंत्रांच्या ठिकाणी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. एवढेच नव्हे तर तेथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे पोलिसांनाच पहाटेर्पयत पहारा द्यावा लागत आहे. त्यामुळे इतर भागातील पेट्रोलिंगच्या फे:यांवर परिणाम झाला आहे. आधीच पोलीस कर्मचा:यांची संख्या कमी आहे. त्यात एटीएमच्या बंदोबस्ताने भर घातली आहे.