नंदुरबारात गौण खनिजाची सर्रास लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:54 AM2020-12-04T11:54:04+5:302020-12-04T11:54:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महसूल विभागाला आव्हान देत लाखो रुपयांचे गौणखनिज दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांना प्रशासना पाठीशी घालत असल्याचे चित्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महसूल विभागाला आव्हान देत लाखो रुपयांचे गौणखनिज दिवसाढवळ्या लुटणाऱ्यांना प्रशासना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. शहरातील वाघेश्वरी टेकडीवरील हजारो ब्रास गौण खनीजाची लूट करणाऱ्यांपर्यंत प्रशासन पोहचू शकले नसल्यामुळे संशय व्यक्त होत आहे. या जागेचा पंचनामा होऊन शासनाच्या राॉयल्टी रुपी लाखो रुपयांची कुणी लुटमार केली याची चौकशी होणे अपेक्षीत आहे.
जिल्ह्यात गौण खनिज अर्थात वाळू, मुरूम, दगड यांची लूटमार करणारी संघटनीत गुन्हेगारी सक्रीय आहे. तापीतील वाळूला हजारो रुपयांचा भाव मिळत असल्याने जिल्ह्यातून दिवसाला शेकडो ट्रका वाळू परजिल्ह्यात जाते. वाळू प्रमाणेच मुरूम व खडी तयार करण्यासाठी दगड या गौण खनिजांची देखील मोठ्या प्रमाणावर लुटमार सुरू आहे. शहराच्या अडोशाच्या भागातून अशी लुटमार तर सुरूच आहे. परंतु शहरातीलच आणि भर वस्तींच्या टेकड्यांमधूनही ही लुटमार दिवसाढवळ्या सुरू आहे. ज्ञानदीप सोसायटी लगत तर खाजगी जागा असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर गौण खनिज काढले जात आहे. परंतु रॅायल्टीच्या स्वरूपात शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविले जात आहे त्याचे काय? हा प्रश्न निर्माण होतो.
पर्यावरणाचा समतोल
शहरात थेट खामगाव शिवारापासून ते चौपाळे शिवारापर्यंत टेकडीची एक रांग गेली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालाणाऱ्या, पर्यावरणाचे संवर्धन करून शहरवासीयांना धूळीपासून, जमिनीच्या धूपपासून आणि जमिनीतील पाणी पातळी टिकविण्यापर्यंत मदत करणाऱ्या टेकड्यांची ही रांग पोखरण्याचे काम गौण खनिजमाफीया करीत असल्याचे चित्र आहे.
हजारो ब्रासची लूट
वाघेश्वरी टेकडी तर पुर्णपणे पोखरून टाकली आहे. टेकडीच्या दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर मुरूम व दगड काढण्यात आला आहे. दररोज दोन ते चार जेसीबी, पाच ते सात डंपर, तेवढीच ट्रॅक्टर भरून येथून गौण खनिज दिवसाढवळ्या लुटले गेले आहे. नागरिकांनी तक्रारी करूनही महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु ‘लोकमत’ने समाजहित लक्षात घेत या प्रश्नाला आणि या लुटमारीला वाचा फोडली. त्यानंतर संबधीतांनी तेथून गाशा गुंडाळला.
पंचनामे का नाही?
असे असले तरी आतापर्यंत येथून काढण्यात आलेले गौणखनिज, पोखरलेल्या टेकड्या यांचा पंचनामा का होत नाही. किती ब्रास गौण खनिज काढले गेले, ते कुणी व कुठे नेले याची चौकशी करण्यास महसूल विभाग का धजावत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. या ठिकाणचा पंचनामा करून संबधितांकडून रॅायल्टी वसूल करणे अपेक्षीत आहे. तसे न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याीच मागणी होत आहे.
पाच पट वसुलीचा नियम
शासनाची परवाणगी न घेता गौण खनिजाचे उत्खनन केल्यास एकुण बाजार मुल्याच्या पाच पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. शिवाय या कामासाठी जे साहित्य वापरण्यात येते जसे जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर व इतर साहित्य जप्त करण्याचा अधिकार देखील संबधित अधिकाऱ्यांना असतो.
खाजगी जमीन असली तरी...
गौण खनिज ज्या जागेवर काढण्यात येते ती जागा जरी खाजगी मालकीची असली तरी त्यांना कुठल्या प्रयोजनासाठी गौण खनिज काढावयाचे आहे. त्याची राॉयल्टी भरणे आदी प्रक्रिया पार पाडाव्याच लागतात. असे असतांना नंदुरबारात त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे.
कारवाईचा दावा... : याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवैध गौण खनिजाबाबत कारवाईचे सत्र सुरू असल्याचे सांगितले. बुधवारी देखील दोन ट्रॅक्टर जप्त केल्याचे सांगून वाघेश्वरी टेकडीवरील उत्खनाबाबत माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.