भगदरी येथे रानभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:27+5:302021-09-19T04:31:27+5:30
भगदरी येथील रानभाजी महोत्सव स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहाने स्पर्धक महिलांनी रानभाजी स्पर्धेत भाग ...
भगदरी येथील रानभाजी महोत्सव स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. यंदाही गेल्या वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहाने स्पर्धक महिलांनी रानभाजी स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन व नियोजन भाग्य उदय वनधन किकास केंद्राचे अध्यक्ष व शेतकरी शास्त्रज्ञ मंच राहुरी कृषी विद्यापीठ सदस्य शेतकरी चद्रसिंग पाडवी, मंगलसिंग पाडवी, धनेश वसावे, यशवंत पाडवी, मनोहर पाडवी, उत्तम पाडवी, प्रेमसिंग पाडवी, सतपालसिंग पाडवी, सुरेंद्र पाडवी, प्रताप वसावे, दारक्या पुंजारा यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोषण वाटिका महाभियान व वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत आलेले मान्यवर व महिलांच्या हस्ते सांस्कृतिक भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. देवमोगरा मातेच्या प्रतिमा पूजनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या रानभाजी स्पर्धेतील महिला आपल्या पारंपरिक वेशभूषेत आल्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच शोभून दिसत होती. नैसर्गिकरीत्या रानातून मिळणाऱ्या सेंद्रिय व आरोग्यवर्धक रानभाज्यांचा आस्वाद रानभाजी महोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील लोकांनी व अधिकाऱ्यांनी घेतला. परिसरात आढळणाऱ्या रानभाज्यांची ओळख नवीन पिढीला व्हावी व त्याची व्यापकता वाढून लोकांचे आरोग्य अधिक सुदृढ होऊन कोरोनासारख्या रोगाला प्रतिकार करणारी रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या रानभाज्यांचा वापर आपल्या आहारात अधिक वाढावा या उद्देशाने भगदरी गावात दरवर्षी रानभाजी महोत्सव स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत जास्तीत जास्त भाज्या आणणाऱ्या आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या भाज्यांची निवड समितीकडून करण्यात येते. निवड झालेल्या स्पर्धेतील महिलांना बक्षीस स्वरूपात सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. जेणेकरून त्यांनी या भाज्यांची जतन आणि जपणूक करून आपल्या परिसरातील या भाज्या परंपरागत टिकवाव्यात. यावर्षीच्या स्पर्धेत सुनीता सुनील वळवी या महिलेला पहिला क्रमांक मिळाला. या महिलेने एकूण ३२ प्रकारच्या रानभाज्या बनवून आणल्या होत्या. नारसिंग झेलसिंग पाडवी यांना दुसरा क्रमांक, लता धनेश वसावे व सविता मंगलसिंग पाडवी यांना तृतीय क्रमांक देण्यात आला. तसेच मोगराबाई आमशा वळवी, लताबाई फत्तू वसावे यांनाही बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात केंद्रीय विस्तार विभाग धुळे (राहुरी कृषी विद्यापीठ) येथून डॉ. मुरलीधर महाजन, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, हेडगेवार सेवा समिती नंदुरबारचे प्रमुख कृष्णदास पटेल, महिला आर्थिक विकास महामंडळाचे मिलिंद पाटील, इन्फोचे अमोल, कृषी विज्ञान केंद्राचे राजेश भावसार व आरती, अरुण कदम, कृषी विभाग अक्कलकुवा येथून दिलीप गावीत, अमोल वायवडे, धडगाव येथून उमेदचे नाना पावरा, डेब्रामाळचे सरपंच भीमसिंग वळवी, राणीकाजल लोकसंचलित साधन केंद्र अक्कलकुवाच्या व्यवस्थापक रिता पाडवी, सोहयोगिनी रमिला वसावे, रिमा तडवी, कौशल्या वसावे, फुलवंती वसावे, बालाघाट येथून कालूसिंग वसावे, बिजरीपाटी येथील वनसिंग वसावे, धनसिंग वसावे, जुनवाणी येथून ओल्या पाडवी व दमण्या पाडवी, आदी उपस्थित होते.