टोलेबाजीविना रंगला सर्वपक्षीय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:32+5:302021-09-19T04:31:32+5:30

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि ...

Rangala should be an all-party gathering without any fuss | टोलेबाजीविना रंगला सर्वपक्षीय मेळावा

टोलेबाजीविना रंगला सर्वपक्षीय मेळावा

Next

नंदुरबार : एखाद्या समारंभाला राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांतील तीन मंत्री, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते, अर्धा डझन आमदार आणि विविध पक्षांचे पदाधिकारी एका व्यासपीठावर उपस्थित राहिले आणि कुठलेही राजकीय भाष्य अथवा टोलेबाजी झाली नाही असे कुणी सांगितल्यास कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, याचा चक्क अनुभव घेतला तो शहादावासीयांनी. स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हा प्रत्यय आला.

स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी स्व. पी.के. अण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शनिवारी पी.के. अण्णा फाउंडेशनतर्फे लोणखेडा, ता. शहादा येथे उभारण्यात आलेल्या पी.के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, आमदार सुधीर तांबे, आमदार राजेश पाडवी, आमदार काशीराम पावरा यांच्यासह सर्व पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते. हा समारंभ म्हणजे जणू सर्वपक्षीय मेळावाच होता. कार्यक्रम तसा पूर्वनियोजित होता; पण मध्येच जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची स्थगिती उठविण्यात आली आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. विशेष म्हणजे ज्या लोणखेडा येथे हा कार्यक्रम होता त्याच गटाची पोटनिवडणूकही होत असून, तेथे खुद्द पी.के. अण्णा पाटील यांच्या स्नुषा जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आचारसंहिता आणि कार्यक्रमाचे औचित्याचे भान सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ठेवल्याने खूप वर्षांनंतर प्रथमच ‘मॅच्युअर पॉलिटिकल इव्हेंट’ जिल्ह्यातील जनतेला पाहायला मिळाला. समारंभात नेत्यांची भाषणेही झाली. या भाषणात कुणीही कुठल्या पक्षावर अथवा वैयक्तिक टीकाटिपणी पूर्णपणे टाळून पी.के. अण्णा पाटील यांचे कर्तृत्व केंद्रबिंदू मानून सर्वांची भाषणे झाली. व्यासपीठावरदेखील सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये राजकीय खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमानंतरदेखील नेत्यांना पत्रकारांनी वैयक्तिक गाठून राज्यातील राजकारणाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली; परंतु त्यावेळीदेखील नेत्यांनी भान ठेवले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार राज्यातील सहकाराच्या स्थितीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी वैयक्तिक आरोप करणे टाळून सहकाराचे स्वाहाकार होऊ नये, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. रस्त्यांबाबतदेखील त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. नुकतेच औरंगाबाद येथील समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाजपच्या नेत्यांना उद्देशून ‘भावी सहकारी’ या वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सावध प्रतिक्रिया दिली. नेत्यांनी भूमिका मांडायची असते आणि कार्यकर्त्यांनी आदेशाचे पालन करायचे असते, अशी सावध प्रतिक्रिया नेहमीच आक्रमक भूमिका मांडणाऱ्या मंत्री पाटील यांनी घेतली. जयंत पाटील यांनीदेखील कुठलेही राजकीय वक्तव्य केले नाही. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे या योजना मार्गी लावण्याची मागणी केली. मात्र, त्यावरदेखील आचारसंहिता असल्याने आज आपण काहीही सांगू शकत नाही; पण आचारसंहिता संपताच या भागात पुन्हा येऊन शेतकऱ्यांचे ऐकून घेऊ व चांगले करता येईल ते करू, असे सांगितले. पूर्ण कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मात्र मुख्य आयोजक व पी.के. अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांना वैयक्तिक टोला लगावला. पी.के. अण्णांशी कौटुंबिक संबंधाचा दाखला देत त्यांनी दीपक पाटील यांना ‘तुम्ही कधी आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षातून कधी दुसऱ्या पक्षात गेले, हे मला तुम्ही सांगितले नाही याची खंत आहे...’ त्यांचे हे वक्तव्य मात्र संपूर्ण कार्यक्रमाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी निश्चितच राहिले.

देवेंद्र फडणवीस यांनी यापुढील काळात पी.के. अण्णांचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करू, असे सांगून शहादावासीयांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या सहानुभूतीपूर्वक वक्तव्याने मात्र शहादा परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

Web Title: Rangala should be an all-party gathering without any fuss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.