संपामुळे नंदुरबार जिल्ह्यातील रेशन दुकानांना कुलूप
By मनोज शेलार | Published: January 3, 2024 05:39 PM2024-01-03T17:39:11+5:302024-01-03T17:39:20+5:30
कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे
मनोज शेलार, नंदुरबार : कमिशन वाढवावे व ई-पॉस मशीन उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्या त्या तालुक्यातील संघटनांनी तहसीलदारांना याबाबत मागण्यांचे निवेदन दिले आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा कमिशन पाच तारखेच्या आत मिळवे, ई-पाॅस मशीन उपलब्ध करून द्यावेत, कमिशन प्रत्येकी तीनशे रुपये करावे, मासिक मानधन ५० हजार रुपये मिळावे, यांसह इतर मागण्यांचा त्यात समावेश आहे.
शासन नेहमीच स्वस्त धान्य दुकानदारांकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक समस्यांनी स्वस्त धान्य दुकानदार ग्रस्त झालेले आहेत. शासनाने मागण्या त्वरित मान्य केल्यास दुकानदारांना प्रोत्साहन मिळेल. ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो. स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेल्या मागण्या या रास्त असून, त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा स्वस्त धान्य दुकानदार आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल, असे संघटनेने म्हटले आहे.