दोघांच्या जन्माने ‘हिरावलेले ते’ परतल्याचा आभास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:51 PM2017-10-18T18:51:34+5:302017-10-18T18:51:34+5:30
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सव्वा वर्षापूर्वी नियतीने एकाचवेळी दोघा भावांना हिरावून घेतल्यानंतर उन्मळून पडलेल्या माता-पित्याने वैद्यकीय आधार घेत पुन्हा मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला़ पन्नाशीनंतर घेतलेल्या निणर्यात मातेच्या पोटी जुळेच जन्माला आल्याने हिरावलेले ते दोघे परत आल्याची भावना तळोदा शहरातून व्यक्त होत आह़े
तळोदा येथील शनि गल्लीतील राजेंद्र पुंजू पाटील (55) यांची दोघे मुले राहूल (28) व विशाल (23) हे दोघे जुलै 2016 मध्ये मित्रांसह धडगाव तालुक्यातील बिलगाव येथे निसर्ग पर्यटनासाठी गेले होते. त्यात तेथील नयनरम्य धबधब्याच्या मोह न आवरता आल्याने ही दोघे भावंडे धबधब्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यात त्यांचा जागीच अंत झाला़ दोघांच्या अकाली मृत्यूमूळे राजेंद्र व उषाबाई पाटील या दोघांना मोठा धक्का बसला़ यातून सावरण्याचा प्रय} ते करत असले तरी तरूण मुले गेल्याचे दु:ख ते विसरू शकत नव्हते. नातेवाईकांनी वेळावेळी साथ देऊनही त्यांचे दु:ख मात्र कमी झालेले नव्हत़े त्यातच उषाबाई ह्यांची 22 वर्षापूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया झाल्यामुळे दाम्पत्याला अधिकच दु:खी होते. तथापि एका नातेवाईकाने सल्लानुसार पूर्वी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत नाशिक येथील डॉक्टरांच्या सल्ला घेतला होता़ यात शस्त्रक्रियेनंतर पुन्हा मातृत्व शक्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला होता़ त्यामुळे पाटील दाम्पत्याने खाजगी रुग्णालयात जावून शस्त्रक्रिया करून घेतली होती़ त्यांनर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार करून घेतल़े गेल्या 9 महिन्यांपासून त्यांनी घेतलेल्या उपचाराचे फलित म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वीच उषाबाई यांनी नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दोघा जुळ्यांना जन्म दिला. साधारण तीन किलो वजनाची ही बालके असून, दोघांची प्रकृती ही सुदृढ असल्याची माहिती देण्यात आली आह़े सोबत बरोबर मातेची प्रकृतीही चांगली आहे. दुर्देवी घटनेत वंशाचे दिवे हरपल्यानंतर पन्नाशी नंतर पाटील दाम्पत्यांना पुन्हा दोन जुळे जन्माला आली आहेत़ जन्माले आलेले दोघेही हुबेहूब राहूल अन् विशाल या दीड वर्षापूर्वी मयत झालेल्या मुलांसारखेच दिसत असल्याने त्यांनीच पुर्नजन्म घेतला असल्याचे बोलले जात आह़े