50 टक्क्यांवरच अडकली वसुली : नंदुरबारातील चार पालिकांची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:23 PM2018-03-17T12:23:10+5:302018-03-17T12:23:10+5:30
अवघ्या 15 दिवसात उद्दिष्टपूर्तीचे आव्हान
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : जिल्ह्यातील चार पालिका व एक नगरपंचायतींच्या विविध करांची वसुली जेमतेम 50 टक्केर्पयत गेली आहे. वसुली उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक असतांना उर्वरित 50 टक्के वसुली कशी होईल याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान, अपेक्षीत कर वसुली न झाल्यास पालिकांच्या अनुदानांना कात्री लावण्याचा इशारा यापूर्वीच नगरविकास विभागाने दिलेला आहे.
मार्च अखेर स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पालिकांच्या विविध करांच्या वसुलीसाठी तगादा लावला जातो. पालिकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत हे पाणीपट्टी व मालमत्ता कर हे आहे. त्यामुळे त्यांच्या वसुलीकडेच जर दुर्लक्ष झाले तर योजनांच्या निधीला कात्रीसह उत्पन्नावर देखील परिणाम होईल त्यामुळे वसुलीसाठी पालिकांच्या वसुलीसाठी आटापिटा सुरू आहे.
तीन महिन्याआधीच नोटीसा
विविध करांच्या वसुलीसाठी पालिकांतर्फे तीन ते चार महिने आधीच नोटीसा दिल्या जात असतात. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात करांचा भरणा केल्यास एकुण रक्कमेवर किमान एक टक्का रिबीट देखील दिले जाते. तरीही नागरिक करांचा भरणा करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे तीन ते चार महिने आधी नोटीसा देवूनही पालिकांना त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षापासूनचे आहे.
आता धावपळ
वसुलीसाठी आता सर्वच पालिकांमध्ये धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात केवळ नंदुरबार ही पालिका अ वर्ग दर्जाची आहे. शहादा ब तर तळोदा व नवापूर क वर्ग दर्जाच्या पालिका आहेत. धडगाव ही नगरपंचायत आहे. या पाचही ठिकाणी कर भरणाचे चित्र फारसे आशादायी नाही. शहादा पालिकेने या सर्व पालिकांपेक्षा थोडीफार आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
कारवाई करणार
नंदुरबार पालिकेने थकीत करांचा भरणा न करणा:या नागरिकांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. यामुळे मालमत्ता थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. काही ठिकाणी जप्ती देखील केली जाणार आहे.
घरगुती करासह सार्वजनिक मालमत्ता, व्यापारी प्रतिष्ठाने यांच्याकडेही मोठय़ा प्रमाणावर कर थकीत असल्यामुळे अशा करदात्यांवरही पालिकेने ठोस कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणुकांमुळे दिलासा
नंदुरबारसह तळोदा व नवापूर पालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्या. उमेदवारीसाठी इच्छुकांकडून मोठय़ा प्रमाणावर विविध करांचा भरणा केला गेला होता. त्यामुळे वसुलीचा आकडा काही प्रमाणात वाढला आहे. एकटय़ा नंदुरबार पालिकेची वसुली सव्वा कोटीर्पयत गेली होती. नंदुरबार पालिकेअंतर्गत 32 हजार 396 विविध मालमत्ताधारक आहेत़ या मालमत्ताधारकांकडून यावर्षी 16 कोटी रूपयांची करवसूली करण्याचे टार्गेट निश्चित करण्यात आले आह़े पालिका निवडणुकीच्या वेळी अर्थात 1 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत तीन कोटी 13 लाख 80 हजार 629 रूपयांचा भरणा नागरिकांकडून करण्यात आला आह़े मार्च महिन्यार्पयत ही वसुली सुरू राहणार असल्याने यात वेळोवेळी वाढ होणार आह़े
गेल्यावर्षी नोटाबंदी जाहिर झाल्यानंतर कर वसुली कशी होईल या संकटात सापडलेल्या पालिका प्रशासनाला शासनाने दिलासा देत जुन्या नोटा स्विकारण्याची मुभा दिली होती़ या पाश्र्वभूमीवर तब्बल 12 कोटी 68 लाख 66 हजार 495 रूपयांची वसुली झाली होती़ डिसेंबरअखेर्पयत सात कोटी रूपयांच्या पुढे करवसूली झाल्याने पालिका प्रशासन समाधानी होत़े नागरिकांनी करभरणा करण्याचा हा उत्साह कायम ठेवला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पालिका निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेल्या उमेदवारांनी पालिकेच्या विविध करांचा भरणा केल्याने कराची रक्कम ही एक कोटी 9 लाख 34 हजार एवढी होती. त्याचा फायदा एकुण वसुलीतील टक्केवारीच्या वाढीसाठी झाला आहे.