‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: October 29, 2023 09:24 PM2023-10-29T21:24:36+5:302023-10-29T21:24:46+5:30

लोकसहभागातून बंधारा

Reflection of Prosperity in Aquaculture of 'Katri'; Water blocked in the river bed of hundred meters | ‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

‘कात्री’च्या जलसंवर्धनात समृद्धीचे प्रतिबिंब; शंभर मीटरच्या नदीपात्रात अडवले पाणी

नंदुरबार : जलसमृद्धी असेल तर गावाच्या शाश्वत विकासाला चांगली गती मिळते. गावातील बहुतांश समस्या पाण्याच्या माध्यमातून सुटत असल्याचे ओळखून अतिदुर्गम भागातील कात्री, ता. धडगाव येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खाट नदीच्या बंधाऱ्यावर बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात १०० मीटरपर्यंत पाणीसाठा झाला असल्याने ग्रामस्थांच्या अनेक समस्या सुटणार आहेत.

गावाचा शाश्वत विकास हा जल समृद्धीभोवती केंद्रित होतो. मुबलक पाण्यामुळे गरिबी निर्मूलन, आरोग्यदायी स्वच्छ गाव, शुद्ध पाणी, सन्मान जनक रोजगार व आर्थिक विकास, पर्यावरणपूरक जीवन यासह विकासाचा अन्य उद्देश साध्य होत असल्याचा विचार घेत कात्री ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत गाव आणि पाड्यांवर खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र जलसंवर्धनाची कामे झाली आहेत. सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षलागवड देखील करण्यात आली.

उपक्रमशील कात्रीच्या प्रत्येक वाड्या-पाड्यातील नदी-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. उपक्रमांतर्गतच गावातून वाहणाऱ्या खाट नदीवर लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष जत्र्या पावरा, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, सरपंच संदीप वळवी, उपसरपंच सुभाष पाडवी, कृषी अधिकारी महाले, कृषी सहायक जगदीश पाडवी, सुनील वळवी, वरखेडीचे मंगेश वळवी, हातधुईचे सरपंच विक्रम तडवी, दिलीप वसावे, दिपक पाडवी, उदय पाडवी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.

जल समृद्धीतच आत्मनिर्भरता

प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे आज कात्री गावात मोठ्या बागा नाहीत. परंतु तेथील प्रत्येक शेतकरी रब्बी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा यांचे उत्पादन घेत आहे. याशिवाय पेरू, डाळींब, लिंबू आदी फळांचे उत्पादनही घेत आहे. या उत्पादनासाठी वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना हातभार मिळत असल्याने आत्मनिर्भर नागरिकांमध्ये भर पडत आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षतेत केवळ शेती व जनजीवनावरच परिणाम होत नाही तर गाई-गुरे व अन्य पाळीव प्राण्यांनाही त्याची झळ पोहोचते, ही संभाव्य समस्या लक्षात घेत बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा गावाच्या मध्यवर्ती असल्याने पाटीलपाडा, पाडावपाडा, खासाडपाडा, आमलीपाडा व अन्य पाड्यांना त्याचा आधार मिळणार आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री तथा संचालक, जिल्हा सहकारी बँक.

Web Title: Reflection of Prosperity in Aquaculture of 'Katri'; Water blocked in the river bed of hundred meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी