साखरपुडा करून मुलीचा ऐनवेळी लग्नास नकार, पाच जणांवर गुन्हा
By मनोज शेलार | Published: January 20, 2024 05:38 PM2024-01-20T17:38:11+5:302024-01-20T17:45:28+5:30
नंदुरबार येथील धुळे चौफुली भागात राहणाऱ्या सरला प्रशांत गवळी यांचा मुलाचा साखरपुडा नायगाव बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर येथील मुलीशी डिसेंबर २०२० मध्ये झाला होता.
नंदुरबार : तीन वर्षांपूर्वी साखरपुडा करून, तीन वर्षांत वेळोवेळी विविध भेटवस्तू घेऊन ऐनवेळी लग्नास नकार देणाऱ्या सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर येथील मुलीसह तिच्या नातेवाइकांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील धुळे चौफुली भागात राहणाऱ्या सरला प्रशांत गवळी यांचा मुलाचा साखरपुडा नायगाव बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर येथील मुलीशी डिसेंबर २०२० मध्ये झाला होता. साखरपुड्यातील सर्व अहेर, भेट दागिने व कपडे देण्यात आले होते. त्यासाठी गवळी यांनी एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. शिवाय मुलीने मुलाकडून दहा हजार रुपयांचा मोबाइलदेखील घेतला होता. वेळोवेळी ऑनलाइन शॉपिंगही केली; परंतु त्यानंतर मुलीला तीन वर्षे शिकायचे असल्याचे सांगून लग्नासाठी थांबण्यास सांगितले.
तीन वर्षांत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये सरला गवळी या लग्नाचे ठरविण्यासाठी नायगाव बानोटी येथे गेल्या असत्या त्यांना मुलीकडच्या मंडळींनी मुलीला श्रीमंतांचे चांगले स्थळ आले असून, तुम्ही तुुमचे पाहून घ्या, म्हणून सांगितले. पैशांची भरपाई मागितल्यास खोटी केस करू, म्हणून धमकीही दिली. यामुळे आपण फसविले गेलो, आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर सरला गवळी यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून राई रमेश जानगवळी (३६), रमेश जानगवळी (४२), पूजा राहुल बाचरकर (२४), दुर्गा अप्पा जानगवळी (४५), विश्वास नावाचा व्यक्ती, असे सर्व नायगाव बनोटी, ता. सोयगाव यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विजया बोराडे करीत आहेत.