प्रादेशिक नियोजन आराखडा तयार : नंदुरबार व शहादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:35 PM2018-04-09T12:35:59+5:302018-04-09T12:35:59+5:30
आगामी 20 वर्षाची लोकसंख्या धरली गृहित, हरकती मागविणार
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : नंदुरबारसह परिसरातील 17 गावे शहादासह लगतची सहा गावे आणि दहा हजारापेक्षा अधीक लोकसंख्या असलेल्या प्रकाशा, सारंगखेडा व अक्कलकुवा या गावांचा आगामी 20 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून प्रादेशिक नियोजन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ावर येत्या दोन महिन्यात हरकती घेता येणार आहेत.
नगर विकास विभागाअंतर्गत नंदुरबार प्रादेशिक नियोजन मंडळाने नंदुरबार व शहादा या मोठय़ा शहरांसह दहा हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकरीता व या गावांची विकसनक्षमता विचारात घेवून विकास केंद्र व सविस्तर नकाशे तयार करण्यात येत आहेत. एकुण तीन विकास केंद्र आणि नंदुरबारसह शहादा शहरालगतच्या गावांचा त्यात समावेश आहे.
गेल्या 50 वर्षातील अर्थात 1961 ते 2011 या कालावधीतील लोकसंख्या लक्षात घेवून 2036 करीता विविध पद्धतीने प्रक्षेपीत लोकसंख्या यांची आकडेमोड करण्यात आलेली आहे. 50 व्यक्ती प्रती हेक्टर या प्रमाणे रहिवास विभाग, शासकीय-निमशासकीय यांच्या अस्तित्वातील जमीन वापराप्रमाणे सार्वजनिक निमसार्वजनिक वापर तसेच उर्वरित भागाकरीता ना विकास विभाग याप्रमाणे नियोजन केलेले आहे. प्रस्तावित रहिवास वापर विभागात प्रस्तावीत रस्ते यांचे नियोजन करून जमीन वापर नकाशे हे प्रादेशिक नियोजन मंडळाकडे अधिनियमाच्या कलम 16 अन्वये मंडळाच्या सभेत सादर करण्यात आली आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. बैठकिला जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, सार्वजनिकक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ आदी उपस्थित होते. बैठकीत याबाबतची सर्व कायदेशीर तरतुदींबाबत माहिती देवून सदरचे प्रस्तावीत जमीन वापर नकाशे हे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 16 च्या तरतुदीनुसार तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. प्रादेशिक योजनेतील दोन परिसर क्षेत्रे तसेच तीन विकास केंद्रे यांचे प्रस्तावित जमिन वापर नकाशे यावर नागरिकांच्या सुचना, हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर सुनावणी होऊन नंतर त्या आराखडय़ास अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
यावेळी अभियंता चंद्रकांत निकम, जिल्हा उद्योग केंद्राचे ए.टी.पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पवार, संजय संगेकर, निलेश चव्हाण, नंदलाल चौधरी, अभिजीत महापात्रे आदी उपस्थित होते.