‘शापोआ’साठी शाळांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:03 PM2019-03-27T21:03:36+5:302019-03-27T21:04:14+5:30

नंदुरबार : एप्रिलपासून ‘पीएफएमसी’ प्रणालीव्दारे शाळांच्या खात्यावर थेट अनुदान

Registration of schools for 'Shapoa' | ‘शापोआ’साठी शाळांची नोंदणी

‘शापोआ’साठी शाळांची नोंदणी

Next

नंदुरबार : शालेय पोषण आहाराचा अनुदान एप्रिल महिन्यापासून थेट शाळांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील शाळांकडून आपआपली माहिती आॅनलाईन पध्दतीने भरण्यात येत आहे़
याआधी जिल्हा परिषदेकडून संबंधित अनुदान शाळांना प्राप्त होत होते़ परंतु अनुदान वाटपामध्ये पारदर्शकता व सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी आता थेट पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील खाजगी, अनुदानीत प्राथमिक तसेच माध्यमिक विभागाच्या जळपास १ हजार ७३१ शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे़ ग्रामीण व शहरी असे दोन विभाग पाडून शालेय पोषण आहाराच्या अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़ यात, ग्रामीण भागातील पहिली ते पाचवीच्या प्रति विद्यार्थ्याला १ रुपया ५१ पैसे तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याला २ रुपये १७ पैसे देण्यात येत असतात़ तर शहरी भागातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४ रुपये १२ पैसे तर सहावी ते आठवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ६ रुपये १८ पैसे अनुदानाचे वाटप करण्यात येत असते़
पहिले जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागाकडून संबंधित शाळांना मागणीनुसार शालेय पोषण आहाराचे अनुदान वितरीत करण्यात येत असते़ यासाठी विभागाला जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती घेऊन त्यांच्याकडून करण्यात आलेल्या निधीची मागणी प्रत्यक्षात वितरीत करण्यात येणारा निधी आदींची गोळाबेरीज करुन अनुदानाचे वितरण करण्यात येत होते़ शालेय पोषण आहार विभागाकडून संबंधित विद्यार्थ्यांना तांदुळ देण्यात येत असतात़ तर तो शिजवण्यासाठी तसेच चटनी, तेल तसेच इतर साहित्यांचा खर्च म्हणून प्रति विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागात ठरविण्यात आलेली अनुदानाची रक्कम देण्यात येत असते़
दरम्यान, १ एप्रिलपासून शासनाने शालेय पोषण आहाराबाबत नवीन धोरण अंमलात आणण्याचे ठरवले आहे़ त्यानूसार पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच पीएफएमसी प्रणालीव्दारे संबंधित शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे़ यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांनी आपआपल्या शाळेची माहिती, विद्यार्थी संख्या, बँक खातेक्रमांक आदींची माहिती शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर भरावयाची आहे़ त्यामुळे १ एप्रिलपासून या नवीन प्रणालीची सुुरुवात होणार असल्याने जिल्ह्यातील शाळा प्रशासनांकडून आपआपली माहिती भरण्यासाठी धावपळ करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील १ हजार ७३१ शाळांकडून ही माहिती भरण्याची काम संख्या सुरु आहे़
दरम्यान, शाळांनी एज्युकेशन महाराष्ट्र या संकेतस्थळावर आपली सविस्तर माहिती भरावयाची आहे़ त्यासाठी संबंधित प्रत्येक शाळांना स्वतंत्र इमेल आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे़ त्यामुळे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक शाळेची आॅनलाईन माहिती अपलोड करीत आहेत़ दरम्यान, काही शाळांनी अद्याप माहिती भरलेली नसल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे ज्या शाळांकडून काही कारणास्तव माहिती भरण्यास विलंब झाला असेल तर अशा शाळांकडून बॅकडेटेड माहिती भरण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे़ शाळांनी लवकरात लवकर माहिती भरावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे़
तथापि, यंदा पहिल्यांदाच पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीव्दारे शाळांच्या खात्यावर शालेय पोषण आहाराचे अनुदान जमा करण्यात येणार असल्याने या नवीन प्रयोगाचे पहिल्याच दिवशी एप्रिल फूल होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे़ विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार ही संकल्पना सुरु झाली, तेव्हापासून या ना त्या कारणाने हा विभाग नेहमीच चर्चेचा ठरत आहे़ गुणवत्ता, ठेकेदारांची नियुक्ती, पोषण आहाराचा गैरव्यवहार आदींमुळे हा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आहे़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून विशेष काळजी घेतली जात आहे़

Web Title: Registration of schools for 'Shapoa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.