गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतून बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत; राज्य शासनाचा अजब प्रकार
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: May 5, 2023 07:12 PM2023-05-05T19:12:18+5:302023-05-05T19:12:31+5:30
याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
नंदुरबार : घरकूल गैरव्यवहार प्रकरणात ठपका ठेवून जिल्हा प्रशासनाने बडतर्फ केलेल्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नियुक्त केलेल्या खाजगी कंपनीने पुन्हा सेवेत घेऊन कार्यरत केल्याचा अजब प्रकार जिल्ह्यात घडला. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
धडगाव तालुक्यातील उमराणी येथील घरकूल प्रकरणातील गैरव्यवहाराची चर्चा जिल्ह्यात गाजली. या प्रकरणाची चौकशी करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ठपका असलेल्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र पुन्हा दोन महिन्यातच या दोन्ही कर्मचाऱ्यांना शासनाने नियुक्त केलेल्या खाजगी कंपनीने पुन्हा त्याच पदावर जिल्ह्यातीलच दुसऱ्या तालुक्यात सेवेत घेतल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी प्रशासनातही चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई चुकीची की दुसऱ्या दबावाखाली ‘त्या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.