शिक्षकांना निवडश्रेणीसाठी प्रशिक्षणाची अट शिथिल करा - सुरेश भावसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:28 AM2021-01-18T04:28:47+5:302021-01-18T04:28:47+5:30
वरिष्ठ श्रेणीसाठी तीन आठवड्यांचे व निवड श्रेणीसाठी ४० दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २६ ऑगस्ट ...
वरिष्ठ श्रेणीसाठी तीन आठवड्यांचे व निवड श्रेणीसाठी ४० दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २६ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणातून सूट देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय वित्त विभागात मंजुरीसाठी पाठविला असता तो काही त्रुटी काढून परत आला व १७ नोव्हेंबर २०२० रोजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या दालनात या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार प्रशिक्षणाची अट रद्द न करता वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर २१ व ४० दिवसांऐवजी ऑनलाईन पद्धतीने १० दिवसांचे देण्यात यावे, असे संबंधितांना आदेशित केले आहे.
त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार सुरेश भावसार यांनी ई-मेलद्वारे महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मुंबई व शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण एस.सी.ई.आर.टी पुणेच्या माध्यमातून सुरू करण्याची मागणी केली असून जोपर्यंत प्रशिक्षण सुरू होऊन पात्र शिक्षक प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत तोपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्र संबंधित शिक्षकाकडून घेऊन वरिष्ठ व निवडश्रेणीचा लाभ त्यांना देण्यात यावा अशी विनंती केली आहे. असे अखिल नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया व शहादा तालुका सरचिटणीस रवींद्र बैसाणे यांनी कळविले आहे.