नंदुरबार रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण काम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:17+5:302021-01-13T05:23:17+5:30
रेल्वेस्टेशन प्रवेशद्वारासमोरील दर्शनी वास्तूमध्ये विविध बदल करण्यात येत असून आकर्षक रंगरंगोटी होत आहे. रेल्वेस्टेशन समोरील भागात झाडांना गवताचे लाॅन ...
रेल्वेस्टेशन प्रवेशद्वारासमोरील दर्शनी वास्तूमध्ये विविध बदल करण्यात येत असून आकर्षक रंगरंगोटी होत आहे. रेल्वेस्टेशन समोरील भागात झाडांना गवताचे लाॅन टाकून आकर्षक स्वरूप देण्यात येत आहे. रेल्वेस्थानक परिसरातील तिरंगा ध्वजाजवळील भागाला आकर्षक स्वरूप मिळावे यासाठी भिंतीवर नंदुरबार जिल्ह्याची सांस्कृतिक चित्रकृती रेखाटण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना नंदुरबार जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख होणार आहे.
रेल्वेस्थानकात प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्षाचे नूतनीकरण करण्यात येऊन चांगली रंगरंगोटी करून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. तसेच आरक्षण व तिकीट काउंटरवर दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नंदुरबार रेल्वेस्थानक विविध सोयीसुविधा पूर्ण तयार करण्यात येत असून काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
रेल्वेस्थानकाबाहेरील परिसरातील रस्ते नवीन तयार करण्यात आल्याने परिसर स्वच्छ दिसून येत आहे. रेल्वेस्थानक परिसरात प्रवााशांना वाहने लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था तयार करण्यात येत आहे. रिक्षा वाहतुकीसाठी स्वतंत्र पार्किंग तयार करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकात व बाहेरील भागात आकर्षक पथदिवे लावण्यात आले आहे. रेल्वेस्थानक परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेस्थानकांच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने त्यांची ये-जा करण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे.