लेटरपॅड चोरीचा बनाव रचून दिशाभूल करणाऱ्या रघुवंशींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवा- प्रा.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:23 AM2021-01-13T05:23:35+5:302021-01-13T05:23:35+5:30

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून ...

Report criminal case against Raghuvanshi for misleading by misrepresenting letterpad theft: Prof. Chaudhary | लेटरपॅड चोरीचा बनाव रचून दिशाभूल करणाऱ्या रघुवंशींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवा- प्रा.चौधरी

लेटरपॅड चोरीचा बनाव रचून दिशाभूल करणाऱ्या रघुवंशींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवा- प्रा.चौधरी

Next

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रकानुसार माजी आमदार रघुवंशी हे जनतेची दिशाभूल करीत असतात. जनतेच्या नजरेत धूळफेक करून जे त्यांच्याकडे नाही, ते दातृत्व दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामपंचायतींना निधी मिळवून देण्याच्या बढाईखोर आवाहनाने त्यांचा हा बुरखा फाटला आहे. बिनविरोध निवडून येईल, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी मिळवून देऊ, अशी घोषणा त्यांनी १५ दिवसांपूर्वी केली होती. १ जानेवारी, २०२१ अशी तारीख घातलेल्या रघुवंशी यांच्याच लेटर हेडवर अधिकृतपणे हे आवाहन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सर्वत्र छापून आले होते. यावर भाजपचे नगरपालिकेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर श्यामराव पाटील यांनी राजभवनात तक्रार केल्यानंतर या प्रकाराची सत्यता समोर आली आहे. त्यांनी राजभवनात दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, १५ लाख रुपये निधीचे प्रलोभन दाखविणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. माजी आमदार रघुवंशी हे जिल्हा परिषद सभागृह अथवा डीपीडीसीचे सदस्य नसल्याने, त्यांना अशी घोषणा करण्याचे अधिकार नसतानाही निधी मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले, शिवाय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला. या सर्व कारणाने रघुवंशी यांच्याविरोधात आचारसंहिता भंग करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, तसेच कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना प्रलोभन दाखवून बेकायदेशीर वर्तन करणे, याविषयी चौकशी होऊन गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी आहे. आता राजभवनातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे धाबे दणाणले आहेत. ती चूक झाकण्यासाठी व आपला खोटारडेपणा लपवण्यासाठी आता ते कांगावा करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करावी, अशी मागणीही प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांनी केली आहे. या संबंधीचे सर्व पुरावे समोर आणून रघुवंशींचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Report criminal case against Raghuvanshi for misleading by misrepresenting letterpad theft: Prof. Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.