बंधा-यातील पाण्यासह आसाणे ग्रामस्थांचेही डोळे पाण्याने डबडबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:38 PM2018-06-04T12:38:57+5:302018-06-04T12:38:57+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वर्षानुवर्ष अवर्षणप्रवण राहिलेल्या आसाणे गावाने यंदा श्रमदानातून घाम गाळला, त्याचे फळ पहिल्याच अर्थात मान्सूनपूर्व पावसात पहाण्यास मिळाले. भर उन्हात राब-राब राबून तयार केलेल्या बंधा:यांमध्ये पाणी साठल्याचे चित्र दिसताच ग्रामस्थांचे डोळेही पाण्याने डबडबले. निमित्त होते, वॉटर कपमध्ये श्रमदानातून करण्यात आलेल्या वन तलाव, सीसीटी आणि माती बांधांमध्ये साठलेल्या पाण्याचे.
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग अर्थात आसाणे, घोटाणे, न्याहली, रनाळे हा भाग नेहमीच अवर्षण प्रवण. तालुक्यातील एकुण पावसाच्या तुलनेत या भागात सरासरी केवळ 40 ते 45 टक्के पाऊस पडतो. परिणामी शेती उत्पन्न तर नाहीच, परंतु उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहीदिशा पाचवीला पुजलेल्या. यंदा पाणी फाऊंडेशनअंतर्गत वॉटर कप स्पर्धेत याच भागातील आसाणे गावाने भाग घेतला. श्रमदानाचे महत्व जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह पाणी फाऊंडेशनच्या पदाधिका:यांनी पटवून दिले. तरुण सरपंच चंद्रकांत युवराज पाटील व गावक:यांनाही ते पटले आणि एका तुफान आल्यागत ग्रामस्थ श्रमदानात रमले. 40 ते 42 अंश तापमानात, घामाच्या धारांमध्ये ग्रामस्थांनी काम केले. त्याचे फळ मान्सूनपूर्व पावसातच पहायला मिळाले. गावक:यांच्या श्रमदानाला विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांचीही साथ मिळाली.
वॉटर कप स्पर्धा गेल्या महिन्यात 24 मे रोजी संपली. त्याआधी गावाने समतल चर, मातीनाला बांध, वनतलाव, जुने तलाव दुरूस्त करणे, नालाबंडींग आदी कामे केली. या कामांचे वॉटर कपअंतर्गत मोजमापास नुकतीच सुरुवात झाली. त्याआधीच या कामांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
शनिवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाले. मान्सूनपूर्व पाऊस येणार की नाही ही शंका असतांनाच शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक ते दीड तास मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात पडला. या पाण्यामुळे आपल्या श्रमदानातील कामांमध्ये पाणी साठले की नाही हे पहाण्यासाठी रविवारचा सूर्योदय होताच ग्रामस्थांनी धाव घेतली. पहातात तर काय? डोंगर उतारावरून नेहमीच वाहून जाणारे पाणी समतल चा:यांमध्ये, माती नाल्यांमध्ये, वन तलावांमध्ये साठलले होते. समतल चरातील पाणी तर जमीनीत मुरले देखील होते. हे पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू निघाले. सरपंच चंद्रकांत पाटील, युवा कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी एकमेकांना साखर भरवून हा आनंद साजरा केला.
पावसाळ्यात या भागात ब:यापैकी पाऊस झाल्यास या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवण होईल असा अंदाज आहे. परिणामी श्रमदान आणि मेहनतीला यंदा फळ येईल या आनंदात सध्या आसाणेकर आहेत.