उमर्दे ते सारंगखेडा पदयात्रेस प्रतिसाद पर्यावरण व पाणी जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:17 PM2019-01-07T13:17:02+5:302019-01-07T13:17:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भालेर : वृक्ष लागवड व संगोपन, पाणी साठवण, मुली वाचवा मुली शिकवा व स्वच्छ भारत अभियान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भालेर : वृक्ष लागवड व संगोपन, पाणी साठवण, मुली वाचवा मुली शिकवा व स्वच्छ भारत अभियान या योजनांचा प्रचार व प्रसार ग्रामीण भागात व्हावा यासाठी रविवारी उमर्दे खुर्द ते सारंगखेडा पदयात्रा काढण्यात आली. त्याला विविध गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उमर्दे गावातूनन सुरुवात झालेल्या पदयात्रेत जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपविभागीय अधिकारी वान्मती सी., अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, वनविभागाचे आर.एस. चौधरी, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगळे, तहसीलदार नितीन पाटील, जालिंधर पठारे, पी.टी. बडगुजर, पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षक सुखदेव भोसले, सूरज शिंदे, वनविभाग व पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. भालेर येथे पदयात्रेचे स्वागत सरपंच गजानन पाटील यांनी केले. या वेळी ग्रा.पं. सदस्य दिनेश पाटील, भास्कर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील स्वच्छतेबाबत जिल्हाधिका:यांनी समाधान व्यक्त केले. पाणी फाऊंडेशन, वृक्षारोपण व त्याचे संवर्धन याविषयी ग्रामस्थांनी संवाद साधला. यंदाचा भीषण दुष्काळ पहाता भविष्यात अशी आपत्ती येऊ नये यासाठी आजच ग्रामस्थांनी कामाला लागून या समस्येवर उपाय शोधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी केले. भालेर येथील संग्राम कक्षाचे काम समाधानकारक असल्याने संगणक चालक मनीषा पाटील तर आरोग्य सेवेचे चांगले काम केल्याबद्दल आशा कार्यकर्ती चंद्रकला पाटील यांचा गौरव करण्यात आला. वृक्ष लागवडीचे चांगले काम केल्याबद्दल क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयाचेही कौतुक केले. 2018 मध्ये जन्मास आलेल्या मुलींचा व मातांचा सन्मान पाच झाडांची रोपे देऊन करण्यात आला. कार्यक्रमात गावातील पाणी मित्रांचाही सन्मान करून भालेर गावातून एक हजार ग्रीन आर्मी सदस्य तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी ग्रा.पं. सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग, ग्रामस्थ, महिला व तरुण यांनी आपले गाव तंटामुक्त करून जलयुक्त करण्याचा संकल्प केला.