महसूल आयुक्तांनी घेतला विविध योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:44 PM2018-03-09T12:44:52+5:302018-03-09T12:44:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान व महसूल कर वसुलीसंदर्भात विभागीय आयुक्त आर.आर.माने यांनी गुरुवारी आढावा घेतला. मार्च अखेर ही सर्व कामे पुर्ण करण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी अधिका:यांना दिले.
विभागीय महसूल आयुक्त आर.आर.माने गुरुवारी नंदुरबारात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी महसूलचे उपायुक्त दिलीप स्वामी, रोहयोचे उन्मेश महाजन, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त माने यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. मार्च अखेर उद्दीष्टपुर्ती कशी होईल यासाठी प्रयत्न करावा. आलेला सर्वच निधी खर्च करण्याकडे कल असू द्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. शिवारफेरीसारख्या उपक्रमातून अभिलेखांचे उपलब्ध अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या सहाय्याने अद्ययावतीकरण करून ते अचुकपणे तयार करावे.
सातबारा संगणकीकरणाचे काम जलदगतीने पुर्ण करावे. कुळ कायद्यांमध्ये झालेल्या सुधारणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकानिहाय शिबिर घेण्यात यावे यासह त्यांनी इतर विविध बाबींचा आढावा घेत मार्गदर्शन केले.
उपायुक्त स्वामी, महाजन यांनी देखील मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी महसूल वसुलीबाबत नियोजनाची माहिती दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे, सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, देवदत्त केकाण, लक्ष्मीकांत साताळकर, धर्मेद्र जैन, नितीन पाटील, मनोज खैरनार, प्रमोद वसावे, योगेश चंद्रे, नितीन देवरे, शाम वाडकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.