तळोद्यात दोन महिन्यांपासून रेबीजच्या लसीचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 03:35 PM2019-03-09T15:35:16+5:302019-03-09T15:36:04+5:30
तळोदा उपजिल्हा रुग्णालय : सर्वसामान्य रुग्णांना बसतोय आर्थिक भुर्दंड
तळोदा : उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे गेल्या दोन महिन्यांपासून श्वान प्रतिबंधक लसीचा तुटवडा असून पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्या रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरून महागड्या लसी घ्याव्या लागत आहेत. रुग्णालय प्रशासनाने लसींची मागणी केलेली असताना अजूनही त्यांना लसी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या अशा उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून याप्रकरणी तातडीने दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत सन २००५ मध्ये येथील कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. साहजिकच या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी असते. परंतु रुग्णालयात पुरेशा आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने नेहमीच उदासीन भूमिका घेतल्याचा आरोप आहे. कुठे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुरेशा संख्येचा अभाव तर कुठे औषधांची, लसींची वाणवा. त्यामुळे रुग्णांनादेखील पुरेशा वैद्यकीय उपचाराअभावी निराशपणे परत जावे लागते. आताही गेल्या दोन महिन्यांपासून श्वान प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. या लसींअभावी श्वानांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या जखमींना उपचाराशिवाय परत जावे लागत आहे. त्यांना नाईलाजाने बाहेरुन खाजगी डॉक्टरांकडून महागड्या लसी विकत घेऊन उपचार करून घ्यावा लागत आहे. एका लसीची किंमत बाजारात साधारण ४५० ते ५०० रुपये याप्रमाणे तीन-चार लसींचे दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गरीब रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यातही पिसाळलेल्या श्वानाने चावा घेतला तर रॅबीज रोगामुळे रुग्णाच्या मेंदूवर त्याचा परिणाम होऊन रुग्णही दगावण्याची शक्यता असते. अशी गंभीर वस्तुस्थिती असताना संबंधितांनी लसी उपलब्ध करून देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. वास्तविक येथील रुग्णालयाच्या प्रशासनाने श्वान प्रतिबंधक रॅबीज लसींची मागणी गेल्या दोन महिन्यांपूर्वीच मुंबई येथील शासनाची हॅपकीनसन इन्स्टिट्यूट या कंपनीत केली आहे. साधारण २५० ते ३०० लसींची मागणी केली आहे. या उपरांतही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. तथापि लसी शिल्लक नसल्याचे मोघम उत्तर त्यांना मिळत आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडेही लसींची मागणी केल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांनीही लसी उपलब्ध नसल्याचे उत्तर संबंधितांना दिले. इकडे शहरात श्वानांनी मोठा उच्छाद मांडला आहे. त्यातही पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या अधिक वाढल्यामुळे त्यांनी लहान बालके, वृद्धांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे रोजच असे रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी दाखल होत आहेत. परंतु येथे लसी नसल्याने उपचार न घेताच परतावे लागत आहे. वास्तविक तळोदा शहर साधारण ५० हजार लोकवस्तीचे शहर आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयही तेवढ्याच सोयी-सुविधांनी, औषधोपचाराने सुसज्ज असणे आवश्यक आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याउलट पाच ते सात हजार लोकसंख्या असलेल्या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांतमध्ये रॅबीजच्या लसींचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने लसी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.