रंगावलीने ओलांडली धोक्याची पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:21 PM2019-08-05T12:21:43+5:302019-08-05T12:21:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यासह शहरात संततधार पावसाचा जोर गेल्या दोन दिवसापासून कायम असून, रंगावली नदीने धोक्याची पातळी ...

Risk levels exceeded by Rangoli | रंगावलीने ओलांडली धोक्याची पातळी

रंगावलीने ओलांडली धोक्याची पातळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यासह शहरात संततधार पावसाचा जोर गेल्या दोन दिवसापासून कायम असून, रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नाले व नद्या धोक्याच्या पलीकडे वाहत असल्याने संपर्क तुटला आहे. 
संततधार पावसाचा तालुक्यात तेरावा दिवस आहे. ही संततधार कायम असल्याने तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती आहे. शहरातील रंगावली नदीवरील महामार्ग क्रमांक सहावरील पुल व बांधकाम विभाग जवळील पुल दुपारी तीन वाजता पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरासारखी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून रंगावली नदीकिनारी राहणा:या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पालिका व पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून, नदीकिनारी  राहणा:या नागरिकांपैकी कुणी राहुन गेले असल्यास तातडीने घर सोडण्याचे आवाहन ध्वनी क्षेपकावरुन करण्यात येत होते. रंगावली नदीवर शहरात तीन ठिकाणी पुल असल्याने पुराची पाहणी करण्यासाठी तिन्ही ठिकाणी बाल गोपालांसह आबाल वृध्दांनी एकच गर्दी केली होती. 
दक्षिण गुजरातमध्ये अतिवृष्टी होत असून लगतच्या नवापूर तालुक्यात त्याचा हा परिणाम दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासात                डांग जिल्ह्यात 200 मिलीमीटर तर सुरत व तापी जिल्ह्यात 150 मिलीमीटर पाऊस झाला आहे. रंगावली मध्यम प्रकल्प पूर्ण भरल्याने शुक्रवारी सकाळपासून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. सांडव्यातून मोठय़ा प्रमाणावर पाणी बाहेर येत आहे. शहरात दाखल होणा:या रंगावली नदीत रंगावली धरणाच्या पाण्यासह डांग भागातील केसबंध व लगतच्या उता:यावरील भागातून वाहुन निघणारे पाणी येत असल्याने मरीमाता मंदीराजवळ उभारलेल्या केटीवेअरच्या एक मीटर वरुन पाणी वाहुन निघाल्याने शहरातील दोन्ही पुल पाण्याखाली गेले. 
रंगावली नदीला महापूर सदृश्य पूर आल्याने भाजीपाला मार्केट पुराच्या पाण्याखाली गेले आहे. हीच स्थिती पुढील काही तास कायम राहील्यास पुराचे पाणी नागरी  वस्तीत शिरण्याची भिती व्यक्त होत आहे. पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदी किनारी कोणी जाऊ नये असे, पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात होते. पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सहकारी तथा पोलीस कर्मचारी रंगावली नदीकिनारी पुलाजवळ ठाण मांडून होते. 
दुपारी चारला रंगावली नदीने धोक्याची पातळी पार केल्याने मरीमाता जवळचा केटीवेअरचा मातीचा भाग वाहून गेला. तिस:यांदा हा मातीचा भराव वाहून गेला. नदी किनारी राहणा:या लोकांनी सायंकाळी घर सामान खाली करण्यास सुरूवात केली होती. शहरातील प्रभाकर कॉलनीत बिकट परिस्थिती झाली होती. इस्लामपुरा भागातील अनेक  घरात पाणी घुसले. पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने दोन्ही ठिकाणी कंबरे एवढे पाणी साचले होते. शहरातील मध्य भागातून  वाहणा:या नाल्याने देखील रौद्र रूप धारण केले होते. पुराच्या संभाव्य धोक्यामुळे घरे खाली केलेल्या नागरिकांसाठी शहरातील अग्रवाल भवनात व जमिअते उल्मा ए हिंदतर्फे निवारा व जेवणाची सोय  उपलब्ध  करून देण्यात आली. तसेच शहरालगत असलेल्या वाकीपाडा गावातही पुराचे पाणी शिरल्याने अनेक  घरातील संसारोपयोगी साहित्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले          आहे.
संततधार पावसामुळे ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी नाले व नदी दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पिंपळनेर राज्य मार्गावर प्रतापपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने पिंपळनेर व आहवाकडे वाहनांची ये-जा बंद झाली. नवापूर ते पिंपळनेर राज्य मार्ग पूर्णत: बंद झाला. आहवा रायपूर आंतरराज्य मार्गावरदेखील एक मोठा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक प्रभावित झाली. अनुदानित आश्रम शाळा वडफळी येथे रविवारी  सकाळी शाळेच्या आवारातील वडाचे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरडू येथील नागन प्रकल्प भरला असून प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार असल्याने धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला  आहे.

भरडू, सोनारे, महालकडू, नवागाव, दूधवे, बिलबारा, तारपाडा या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी व नदीकाठी जाणे टाळावे अश्या आशयाची दवंडी देण्यात आली. या गावांमधील तलाठी, मंडळ अधिकारी व सरपंचांकडून गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. संततधार पाऊस व ग्रामीण भागातील तुटलेला संपर्क या पाश्र्वभूमीवर राज्य परिवहन विभागाच्या ग्रामीण भागातील बस फे:या रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. संततधार पाऊस कायम असतांनाही विद्युतपुरवठा अखंडित सुरु राहिल्याने नागरिकांसह प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. गेल्या दोन आठवडय़ापासून नवापूर तालुक्यात अतिवृष्टी होत असून पुढील 48 तास नवापूर व आसपासच्या भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

Web Title: Risk levels exceeded by Rangoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.