नदीचा पूर ओसरला, आता पिडीतांच्या डोळ्यातून महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:56 PM2019-08-11T12:56:41+5:302019-08-11T12:56:48+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने निम्मे जिल्ह्यात हाहाकार उडविला आहे. ...

The river flooded, now flooded with victims' eyes | नदीचा पूर ओसरला, आता पिडीतांच्या डोळ्यातून महापूर

नदीचा पूर ओसरला, आता पिडीतांच्या डोळ्यातून महापूर

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने निम्मे जिल्ह्यात हाहाकार उडविला आहे. शनिवारी पावसाने विश्रांती दिल्याने नदी, नाल्यातून पूर ओसरला असला तरी या पुराने दिलेल्या वेदनेमुळे शेकडो शेतक:यांच्या  डोळ्यातून आता महापूर वाहू लागला आहे.दरम्यान प्रशासनाने गांभिर्याने दखल घेवून पिडीत शेतक:यांना आधार देण्याची गरज आहे.
पाऊस आणि शेतकरी यांचे नाते गेल्या काही वर्षापासून विळ्या-भोपळ्याचे झाले आहे. गेली काही वर्ष कमी पाऊस झाल्याने कोरडा दुष्काळाच्या सामना शेतक:यांना करावा लागला आहे. या वर्षी मात्र पावसाची प्रतिक्षा असतांनाच गेल्या दहा दिवसात अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे जमिनील पाण्याची पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाचाही प्रश्न सुटल्याने जिल्ह्यातील निम्मे भागात समाधानाचे वातावरण असतांना गेल्या दोन दिवसात सातपुडय़ात झालेल्या अतिवृष्टीने त्याच्या पायथ्यालगतच्या शेकडो गावात मात्र हाहाकार उडविला आहे. 
सातपुडय़ातून उगम पावणा:या वाकी, कन्हेरी, सुसरी, गोमाई, वरखेडी, निझरा या नद्यांसह परिसरातील नाल्यांना अचानक महापूर आला. हा पूर इतका प्रचंड होता की त्याने नदी, नाल्याचे पात्र 100 मिटरपासून तर 500 मिटर्पयत रूंद करून ते वाहू लागले. त्यामुळे नदी काठावरील शेती रात्रीतून होत्याची नव्हती झाली. शेकडो हेक्टर शेती अक्षरश: वाहून गेली. त्या शेतीला नदीचे रूप येवून त्यात केवळ वाळू शिल्लक राहिली आहे. तब्बल दोन ते तीन मिटर खोल शेतातील माती पुर्ण वाहून गेल्याने या शेतांमध्ये आता शेती करणे कठीण झाले आहे. तर अनेकांच्या शेतातील पिके वाहून गेली. 
पपई, केळी, मका, सोयाबीन, कापूस हे सर्वच पिके वाहून गेल्याने जिल्ह्यातील निम्मे भागातील खरीप हंगामच पुर्णत: वाया गेला आहे. शहादा तालुक्यातील तलावडी, अनकवाडे, पिंपरी, अवघे, जुनवणे, होळ, मोहिदा, भादा, अलखेड, कलसाडी, काथर्दा खुर्द, त:हाडी, परिवर्धा, तसेच तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, खरवड, खेडले यासह धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील असंख्य गावांचे कोटय़ावधी रुपयांचे नुकसान या पावसाने केले आहे. 
शनिवारी या नुकसानग्रस्त भागातील भादा, काथर्दा, कलसाडी, परिवर्धा या भागात फेरफटका मारला असता चौकाचौकात शेतकरी एकत्र येवून हताश होऊन बसलेले दिसून आले. प्रत्येकजण आपापल्या    शेतातील नुकसानीची माहिती एकमेकांना सांगून एकमेकांचे सांत्वन करतांना दिसून  आले. मध्येच मिश्किलपणे एखादा शेतकरी विनोद करीत धिरगंभीर वातावरण   हलकेफुलके करण्याचा प्रय} करीत होते. परंतु आपल्या डोळ्यातील अश्रू मात्र ते लपवू शकत नव्हते. 
नुकसानग्रस्त सर्वच गावांमध्ये थोडय़ाफार फरकाने असेच वातावरण होते. भादा येथील नरोत्तम विठ्ठल पाटील, मोहन सुदाम पाटील, अंबालाल सखाराम पाटील, हरि पाटील, विजय पाटील, कांतिलाल पाटील, मोहन पाटील, काशिनाथ पाटील, सुरेश पाटील यासह 50 हून अधिक शेतक:यांचे प्रचंड नुकसान झाले    आहे.   
अशीच अवस्था काथर्दाखुर्द येथेही दिसून आली. तेथील लक्ष्मण पाटील यांच्या सुमारे 30 एकरपेक्षा अधीक क्षेत्रात नुकसान झाले तर नाना पाटील, येशूनाथ कोळी, काशिनाथ कोळी, कपील पाटील यासह असंख्य शेतक:यांचे नुकसान झाले. 
आता नुकसान ग्रस्त शेतक:यांच्या नजरा मायबाप सरकारकडे लागून असून आपल्या गावात कुणीतरी सरकारी अधिकारी येईल, पंचनामे सुरू होतील आणि मदतीची कार्यवाही सुरू होईल याचीच प्रतिक्षा लागून आहे. 

Web Title: The river flooded, now flooded with victims' eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.