मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला केलेला रस्ता दोन तासात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:54 PM2019-08-24T12:54:15+5:302019-08-24T12:54:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला करण्यात आलेला भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्ता अवघ्या दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेसाठी खुला करण्यात आलेला भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्ता अवघ्या दोन तासानंतर पुन्हा बंद करण्यात आला. शहरवासीयांच्या नशीबी पुन्हा गाळ आणि चिखलातूनच वाट काढावी लागण्याची वेळ आली. दरम्यान, वाहतुकीच्या नियोजनाअभावी शुक्रवारी दुपारी या ठिकाणी दोन बसेसचा अपघात थोडक्यात टळला.
धुळे रस्त्यावरील भोणे फाटा ते वाघेश्वरी चौफुली रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. या कामाच्या ठेकेदाराची मनमानी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गाळ आणि चिखलातून वाहनचालकांना अगदी तारेवरची कसरत करीत वाहन काढावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार म्हणून काँक्रीटीकरणाची एक बाजू तातडीने पुर्ण करण्यात आली.
मुख्यमंत्री दोन तास शहरात होते. त्यावेळपुरता हा रस्ता केवळ त्यांच्याच वाहनांच्या ताफ्यासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर तो पुन्हा बंद करण्यात आला. पर्यायी रस्त्यावर चिखल, गाळ मोठय़ा प्रमाणावर आहे ते काढणे व मुरूम टाकून भराव करण्याचे काम ठेकेदाराचे असतांना त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
परिणामी दररोज या ठिकाणी लहानमोठे अपघात होत आहेत. व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. शुक्रवारी दुपारी दोन एस.टी.बस एकमेकांना घासल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. अखेर महतप्रयासाने या बसेस तेथून काढण्यात आल्या. याला कारण या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन नसणे. दहा मिनिटे एका बाजुने तर दहा मिनिटे दुस:या बाजुने वाहने सोडल्यास येथील रहदारीची आणि लहान, मोठे अपघात टाळता येणार आहेत. परंतु त्याकडेही वाहतूक विभागाने दुर्लक्षच केले आहे.