नाईट चार्ज आडून टॅक्सी चालकांकडून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:13+5:302021-09-23T04:34:13+5:30
ब्राह्मणपुरी : शहादेकरांना टॅक्सी चालकांची मुजोरी किंवा मनमानी काही नवीन नाही; मात्र आता रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चुना लावण्याचे ...
ब्राह्मणपुरी : शहादेकरांना टॅक्सी चालकांची मुजोरी किंवा मनमानी काही नवीन नाही; मात्र आता रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चुना लावण्याचे काम शहादा-नंदुरबार टॅक्सी चालकांकडून होताना दिसून येत आहे. सायंकाळी सात वाजेची नंदुरबार बस निघाल्यावर रात्री सात वाजेनंतर प्रवाशांना टॅक्सीची सोय आहे. परंतु त्याचा गैरफायदा उचलत अनेक टॅक्सी चालक नाईट चार्ज लावून प्रवाशांपासून अतिरिक्त भाडे आकारात आहेत.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी सायंकाळी सात वाजेपावेतो नंदुरबार बस सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु सायंकाळी सात वाजेनंतर प्रवाशांना नंदुरबार जाण्यासाठी बस नसल्याने नाईलाजाने खासगी टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. परंतु काही टॅक्सी चालकांकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.
प्रवाशांनो व्हा जागे ?
टॅक्सी, रिक्षाचालक जर तुमच्याकडून जादा भाडे आकारत असतील तर तुम्ही परिवहन विभागाच्या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरूपात तक्रार करावी. त्यानंतर वाहनचालकांवर मोटार परिवहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. यामध्ये चालकाचा परवाना रद्द करणे आणि आर्थिक दंड आकारणे अशी कारवाई केली जाते. त्यामुळे प्रवाशांनी यासंबंधी जागृत राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक प्रवाशांकडून यासंबंधी रितसर तक्रार होत नसल्याने अशा मुजोर टॅक्सी चालकांवर कारवाई करणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची लूट होताना दिसून येत आहे.
शहादा ते नंदुरबार शेवटची बस निघाल्यानंतर प्रवास करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून टॅक्सी किंवा प्रायव्हेट गाडी हा पर्याय असतो. त्यात टॅक्सी चालक आणि गाडी भरणारे यांची मुजोरी स्पष्ट दिसून येते. साधारण ५५ रुपये बसचे भाडे आहे आणि टॅक्सीचे ६० रुपये आहे तरी सुद्धा मर्यादेपेक्षा जास्त भाडे प्रवाशांकडून आकारले जात आहे. यावर टॅक्सी चालक मालक संघटनेने काही उपाय करावा किंवा जादा बस सोडण्यात याव्यात.
-राहुल बाविस्कर प्रवासी -