‘रॉज रींग प्याराकीट’चा प्रकाशात जाणवतोय अधिवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:42 PM2018-09-26T12:42:42+5:302018-09-26T12:42:46+5:30
प्रकाशात मोठी संख्या : पक्षीप्रेमींमध्ये समाधान, सातत्याने होत होती घट
नरेंद्र गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा येथील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पोपट जातीतील ‘रॉज रींग प्याराकीट’ जातीच्या नर-मादींचा अधिवास निसर्गप्रेमींना जाणवत आह़े या पक्षाची प्रजात सर्वसामान्य गटात मोडण्यात येत असली तरीही प्रकाशा येथे सध्या यांची मोठी संख्या पक्षीप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरत आह़े
‘रॉज रींग प्याराकीट’ हा पोपट जातीतील पक्षी असून तो दिसण्यास हिरवा रंगाचा असतो़ त्याच्या माने जवळ लाल रंगाचे काळपट वलय असत़े कळप करुन राहणे या पक्षाला अधिक पसंत असल्याचे पक्षीप्रेमींकडून सांगण्यात आल़े सध्या तापी काठावर या पक्षांचा मोठय़ा प्रमाणात वावर दिसून येत आह़े
तळोदा येथील पक्षी अभ्यासक ए.टी.वाघ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा प्याराकीट जातीचा पक्षी सर्वसाधारणपणे आढळत असला तरी जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून याची संख्या घटत जात आह़े नर जातीच्या पक्षाला मानेभोवती गुलाबी रंगाचे वलय असते. मादीला काळ्या रंगाचे वलय असत़े मिरची, पेरू, भात आदी आवडीचे खाद्य पदार्थ आहेत़ या पक्षाचे वजन 95 ते 140 ग्रॅम इतके असू शकते. याची लांबी 38 ते 42 सेंटीमीटर इतकी असू शकत़े बोलायचे म्हटल्यास साधारणत: अडीचशे शब्द बोलण्याची या पक्षाची क्षमता आह़े ‘रॉज रींग प्याराकीट’ हा पोपट जातीतील पक्षी शेडय़ुल चारमध्ये समाविष्ट होत असतो़ त्याला पाळण्यास किंवा बंदिस्त करुन ठेवल्यास हा गुन्हादेखील ठरु शकतो़ प्रकाशा येथे या पक्षाचा अधिवास जाणवू लागला असल्याने पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झालेले आहेत़
तापी काठावर पक्षांचे कळप दिसू लागले आह़े पूर्वी क्वचितच दिसणारा हा पक्षी आता मोठय़ा संख्येने दिसू लागत आह़े हे पक्षी नेमके कोठून आले, या मागे काही विशेष कारण आहे काय? याचा शोध पक्षीप्रेमींकडून घेण्यात येत आह़े या पक्षाची जात कमी होत चालली असल्याने त्यांचे संवर्धन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितल्यानुसार या प्याराकीट पक्षाचा वापर हा पूर्वी भविष्य वर्तविण्यासाठी करण्यात येत होता़ परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पक्षांना बंदिस्त करुन ठेवणे शिक्षा व दंडास पात्र असल्याने या पक्षांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याचा अंदाज व्यक्त होत आह़े
भविष्य वर्तविण्यासाठी या पक्षाचा वापर करण्यात येत असल्याने सातत्याने यांची संख्या घटत होती़