ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 01:11 PM2020-12-27T13:11:55+5:302020-12-27T13:12:06+5:30

हिरालाल रोकडे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतसोबत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ...

The rural atmosphere heated up for the Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण वातावरण तापले

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण वातावरण तापले

Next

हिरालाल रोकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतसोबत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काय घडले व आता कसे घडणार अशा चर्चा गुलाबी थंडीत शेकोटीभोवती रंगत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या ग्रामपंचायतींबाबत सर्वाधिक चर्चा रंगत असून, यंदा उमेदवार व त्यांचे प्रमुख कशा पद्धतीने निवडणुकीचे नियोजन करतात, काय नवीन पायंडा पडतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींपैकी अनेक मोठ्या ग्रामपंचायती बिगर आदिवासी क्षेत्रातील असल्याने यंदा निवडणुकीचा फड कसा रंगतो याची उत्सुकता लागली आहे. तालुक्यातील तोरखेडा, बामखेडा, सारंगखेडा, मोहिदे त.श. व असलोद या पाच ग्रामपंचायती मोठ्या असून, सर्वाधिक सदस्य संख्या याच गावात आहे. विशेष म्हणजे पारंपरिक राजकीय विरोधकांच्या जुगलबंदीमुळे या ग्रामपंचायती नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. गेल्या निवडणुकीत प्रचंड प्रमाणात येथील निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. मतदारांना अनुभवण्यासाठी उमेदवारांनी केलेले प्रयत्न व खर्च सारे उच्चांक तोडून गेला होता. परिणामी आताही या पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात मोहिदे त. श. ग्रामपंचायतीची चर्चा सर्वाधिक झाली होती. गतवेळच्या निवडणुकीत दोन्ही गटांतर्फे करण्यात आलेला प्रचार चर्चेचा ठरला होता. यंदा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल का याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा ठेवली असली तरी ही निवडणूक कोट्यवधी रुपये खर्चाची झाली असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात झाली होती. अशीच काही बाब सारंगखेडा ग्रामपंचायतीची आहे. वर्षानुवर्षे एकाच परिवाराच्या ताब्यात ही ग्रामपंचायत असल्याने यंदा याची पुनरावृत्ती होते की सत्ता परिवर्तन होते याबाबतही चर्चा सुरू आहे.
शहादा तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झालेले आहे. शहादा व नंदुरबार अशा दोन्ही विधानसभा मतदारसंघात या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकण्यासाठी दोन्ही आमदारांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आमदार एकाच पक्षाचे असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे त्यांच्यासमोर ऐनवेळी आव्हान निर्माण होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.
एक खासदार, दोन आमदार, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद व जिल्हा परिषदेच्या १४ गटापैकी नऊ गट व जिल्हा परिषदेचे सभापती पद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे आता या निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जातात यावरही जय-पराजयाची शक्‍यता सर्वाधिक असल्याने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान लोकप्रतिनिधींसह माजी लोकप्रतिनिधींनीही लक्ष घातले असल्याने या निवडणुका निश्चितच चुरशीच्या होणार असल्याने कडाक्याच्या थंडीच्या गारठ्यात राजकीय वातावरण मात्र ग्रामीण भागात कमालीचे तापले आहे.

आरक्षणाच्या निर्णय बदलामुळे सावध भूमिका
शहादा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतींत निवडणुका होत असल्याने ग्रामस्थ व मतदारराजा आतापासूनच कामाला लागले आहेत. अगोदर सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. ऐनवेळी ते आरक्षण रद्द करण्यात आल्याने जे सरपंचपदासाठी इच्छुक होते त्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा आरक्षण जाहीर करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. परिणामी बोहल्यावर कोण चढणार याची उत्सुकता लागून आहे. प्रमुखांनी आतापासूनच सावध पवित्रा घेत आपला हात आखडता घेतला आहे. इच्छुक उमेदवारांनी सावध भूमिका घेतली असली तरी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माघारीनंतर आणखी किती उमेदवार रिंगणात राहतात त्यावर बरेचसे गणित अवलंबून राहणार आहे.


अंतर्गत गटबाजीची शक्यता
ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात असावी या उद्देशाने सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे तर यंदा काही झाले तरी सत्तापालट करायचाच असा निर्धार विरोधकांनी केला असल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदारांना मोठा भाव असणार आहे. त्यातच विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात सत्तांतर झाल्याने पारंपरिक विरोधक असले तरी ते आता एकाच पक्षात असल्याने यंदा अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

Web Title: The rural atmosphere heated up for the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.