सी-लेज ठरणार ग्रामविकासाचा माईलस्टोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 12:12 PM2019-12-08T12:12:47+5:302019-12-08T12:12:54+5:30
सिटी टू व्हिलेज अर्थात सी-लेज हा शेतकऱ्यांना स्थानिक ठिकाणीच संशोधीत उत्पादनातून आर्थिक स्तर वाढविण्याचा उपक्रम आहे. कबचौ विद्यापीठ, केव्हीके, बायफ , विज्ञान व तंत्रज्ञान आयोग बीआरसी मिळून जिल्ह्यात हा उपक्रम राबवीत आहे.-प्रा.जे.बी.जोशी
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्या सहकार्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला सी-लेज प्रकल्प मंजुर झाला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातून समृद्धी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील बारीपाडा, खांडबारा, शितलपाडा, नगाव, बालआमराई या गावांचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम ग्रामविकासाचा माईलस्टोन ठरणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मश्री प्रा.जे.बी.जोशी यांनी केले.
प्रश्न : सी-लेज उपक्रमाचा उद्देश काय आहे, त्यातून काय निष्पन्न होईल?
उत्तर : सी-लेजचाच अर्थ शहरातून गावात असा आहे. आतापर्यंत जे ही संशोधन होते, प्रयोग होतात ते शहर केंद्रीत राहतात. त्यामुळे गाव हा केंद्रबिंदू माणून त्या अनुषंगाने शेतकरी आणि गावकरी समृद्ध झाला पाहिजे हा उद्देश आहे. शेतीचा कस वाढविणे, शेतातून निर्माण होणारा घन कचºयाचा उपयोग करणे व त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे देखील अपेक्षीत आहे.
प्रश्न : शेतकºयांना याचा फायदा काय व कसा मिळू शकतो?
उत्तर : आजच्या स्थितीत शेतातून साधारणत: ६०० मिलीयन टन घनकचरा निघतो. यातून डिझेल बनविता येऊ शकते, कोळसा कांडी तयार करता येऊ शकते. खत तयार करता येते. त्यातील काही भाग शेतातच वापरला तर शेतीचा कस वाढवता येऊ शकतो. उत्पादकता वाढविता येऊ शकते. याच घनकचºयाचा उपयोग बायोगॅससाठी देखील करता येऊ शकतो का? याचे संशोधन करण्यात येत आहे.
प्रश्न : आतापर्यंत असे प्रयोग किंवा उपक्रम कुठे सुरू आहेत?
उत्तर : उपक्रम म्हणण्यापेक्षा आम्ही विविध भागात भेटी देवून तेथील शेतकरी, उत्पादक समृद्ध कसा होईल, काय संशोधन करता येईल याची चाचपणी केली आहे. कोकण आणि विदर्भाचा पूर्व भागात गेलो आहेत. काजू फळापासून इथेनॉल तयार करता येते. परंतु त्यापुढे जावून आम्ही संशोधन करीत आहोत.
१२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी....
विद्यापीठाच्या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये संशोधन करणे, पहाणी करणे यासाठी रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे १२ प्राध्यापक, २४ संशोधक विद्यार्थी प्रा.जोशी यांच्या सोबत आहेत. विविध बाबींचा आढावा घेवून, माहिती घेवून आणि याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पहाणी हे पथक दोन दिवसात करणार आहे.
उत्तर मिळाले ते वापरले गेले पाहिजे...
कुठल्याही संशोधनातून उत्तर मिळाले तर ते वापरले गेले पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे. परंतु आपल्याकडे ते फार कमी दिसून येते. या उपक्रमातून संशोधनातून निघालेल्या निष्कार्षाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे हा आग्रह राहणार आहे. सोशल मार्इंडसेट पदरात पाडून घेतला गेला पाहिजे. संशोधक विद्यार्थ्यांना त्यासाठीच प्रोत्साहित केले जात असते.