स्वच्छतेचे धडे देणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्ये सॅॅनेटायझर दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:41 AM2020-07-16T11:41:49+5:302020-07-16T11:41:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनावर मात करण्यासाठी धडाडीने कामाला लागलेल्या जिल्हा प्रशासनाकडून जनतेला वेळोवेळी स्वच्छता ठेवण्याचे धडे दिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनावर मात करण्यासाठी धडाडीने कामाला लागलेल्या जिल्हा प्रशासनाकडून जनतेला वेळोवेळी स्वच्छता ठेवण्याचे धडे दिले जात आहेत़ यात हात सॅनेटायईझ करावे यावर भर देण्यात येत आहे़ हा भर केवळ जनतेपुरताच मर्यादित असून शासकीय कार्यालये मात्र सॅनेटायझर वापराविनाच असल्याचे चित्र आहे़
‘लोकमत’ शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये याबाबत सर्वेक्षण केले असता, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय या दोन प्रमुख कार्यालयात दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या सॅनेटायझरच मिळत नसल्याचे दिसून आले आहे़ या कार्यालयांच्या प्रवेशद्वारा ‘मानवी पहारा’ ठेवण्यात आला असला तरी आरोग्य सुविधांचा मात्र बोजवारा उडाल्याचे दिसून आले़ जिल्हाधिकारी कार्यालयात विविध १६ प्रकारचे विभाग आहेत़ यामुळे या कार्यालयात विविध तीन प्रवेशद्वारातून नागरिक प्रवेश करतात़ सध्या एकाच ठिकाणाहून प्रवेश देण्यात येत आहे़ याठिकाणी ‘जुजबी’ व्यवस्था म्हणून कचकड्याच्या एका बाटलीत सॅनेटायझर टाकून ती चॅनलगेटवर लटकवली आहे़ सायंकाळी या बाटलीत एक थेंबही सॅनेटायझर नव्हता़ ऐन कार्यालय सुटण्याच्यावेळी सॅनेटाझर नसल्याने बाहेर पडणाऱ्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत होता़
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशक्षद्वार आहे़ याठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त आहे़ परंतु त्याठिकाणी सॅनेटायझेशन करण्याची कोणतीही सुविधा मात्र दिसून आली नाही़ या इमारतीतील विविध कक्षांत सॅनेटायझर असे अशी अपेक्षा होती़ मात्र कोणत्याही ठिकाणी सॅनेटायझर दिसून आले नाही़
दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या दालनाबाहेर स्वतंत्र व्यवस्था करुन सॅॅनेटायझरची एक बाटली ठेवण्यात आल्याचे दिसून आले़ इतर विभागांच्या बाहेर सॅनेटाझर दिसून आले नाही़
एकीकडे कार्यालयांमध्ये सॅनेटायझरबाबत उदासिनता असली तरी काम करणारे काही कर्मचारी याबाबत सजग असल्याचे दिसून आले आहे़ काहींच्या बॅगमध्ये स्वतंत्र सॅनेटायझरची बाटली यावेळी दिसून आले़