सारंगखेड्यात ७१ जणांंनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:04+5:302021-07-15T04:22:04+5:30
सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत’ने लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये २ जुलै ते २१ ...
सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत’ने लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये २ जुलै ते २१ जुलै दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात सारंगखेडा येथे ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
उत्तर कार्याच्या दिवशी परिवाराने दिली रक्तदानातून अनोखी श्रद्धांजली
सारंगखेडा, ता.शहादा येथील दिलीप देवीदास पटेल यांचे ४ जुलैच्या रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या उत्तर कार्याचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या परिवारातील पाच तरुणांनी रक्तदान या महान यज्ञात रक्तदान केले. या रक्तदानातून त्यांनी आपल्या परिवारातील लाडक्या आणि प्रमुख घटकाला अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या या कार्याची संपूर्ण परिसरात चर्चा झाली.
सारंगखेडा येथील लोकमतचे वार्ताहर जितेंद्र गिरासे यांच्या कुटुंबातील सात सदस्यांनी रक्तदान या महान यज्ञात आपला सहभाग नोंदवत सामाजिक कर्तव्याची जाण ठेवत रक्तदान केले. यात त्यांची पुतणी कीर्ती गिरासे हिने प्रथमच रक्तदान करून रक्तदानच्या यज्ञात सहभाग नोंदवला.
पाच महिलांनी केले रक्तदान
बुधवारी झालेल्या रक्तदान शिबिरात पाच महिलांनी स्वयंस्फूर्तीने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. रक्तदानपेक्षा मोठे कोणतेही दाण नाही. त्याच बरोबर गरजूंना आपले रक्त उपयोगी पडावे म्हणून या महायज्ञात आपणदेखील सहभागी झाल्याची प्रतिक्रिया रोहिणी सदानंद पाटील यांनी लोकमतला दिली.
दिव्यांग संजय मिस्तरी यांचे कमी वय असल्यामुळे त्यांना रक्तदान न करता आल्याने हिरमोड
रक्तदान हे महान कार्य आहे. या कार्यात आपलाही सहभाग असावा म्हणून दोन पायांनी दिव्यांग असलेल्या संजय मिस्तरी या युवकाने रक्तदानात सहभाग नोंदवण्यासाठी मोठ्या उत्साहाने शिबिरात उपस्थिती दिली; मात्र रक्तदानाचे महत्त्व दिव्यांग संजय मिस्तरी यास कळाल्याचे पाहून रक्तसंकलित करणारे व उपस्थित चकित झाले.
रक्तदानात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग
सारंगखेडा येथील रक्तदान शिबिरास येथील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले.
शिबिरासाठी सारंगखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य दर्शन पाटील, जयवंत पाटील, हिमांशू पाटील, तुषार पाटील, प्रशांत पाटील, महेश पाटील, योगेश पाटील, रूपेंद्र रावल, पप्पू रावल, कन्हैया पाटील, नीलेश पाटील, राहुल रावल, विक्रांत रावल, राहुल गिरासे, भूषण गिरासे, नवयुग मित्र मंडळाचे सदस्य, महाराणा प्रताप मित्र मंडळाचे सदस्य, भोई समाज मंडळाचे सदस्य, वीर एकलव्य मंडळाचे सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मित्र मंडळ, वाल्मीक समाज मंडळ, दत्त मंदिर ट्रस्टचे सदस्य तसेच सारंगखेडा ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यावेळी टेंभा येथील तीन, कळंबू दोन, पुसनदच्या तीन रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी धुळे येथील नवजीवन रक्त संकलन पेढीचे संचालक डॉ.सुनील चौधरी, दिलीप पाटील, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पाटील, चंद्रकांत दंडगव्हाळ, पांडुरंग गवळी यांनी परिश्रम घेतले. सभागृह उपलब्ध करून देण्यासाठी दत्त मंदिराच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.