नवापूर शहरातील सरदार चौक आणि इंदिरानगर परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:37 PM2020-07-21T12:37:11+5:302020-07-21T12:37:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील सरदार चौक परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, इंदिरानगर मधील ७५ वर्षीय वृध्द व विसरवाडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील सरदार चौक परिसरातील ४८ वर्षीय पुरुष, इंदिरानगर मधील ७५ वर्षीय वृध्द व विसरवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष आज कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने तालुक्याची वाढती संख्या १५ वर पोहोचली आहे.
रविवारी दुपारी कोरोनासदृश लक्षणांमुळे शहरातील सरदार चौक भागातील ४८ वर्षीय पुरुषाने स्वत:हून जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. आज त्यांना सुरत येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्रशासनाकडुन सरदार चौकचा परिसर लागलीच सील करुन कंटेन्टमेंट झोन उभारण्यात आला. झोनच्या उभारणीमुळे शनी मंदीर व पालिका कार्यालयात प्रवेश होणारा एक मार्ग बंद तर दुसरा मार्ग सुरु राहिला आहे. शहरातील इंदिरानगर येथे एक आठवड्यापूर्वी धुळे येथून मुलीकडे आलेल्या ७५ वर्षीय वृध्दास आज अचानक त्रास झाल्याने नंदुरबार येथे हलविण्यात आले. सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाची संपुर्ण यंत्रणा दाखल झाली. परिवारातील सात जणांची विलगीकरण कक्षात रवानगी करुन प्रशासनाने परिसर सील करुन कंटेन्टमेंट झोनची आखणी केली. विसरवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचा अहवाल धुळे जिल्हा प्रशासनाकडुन नंदुरबार व तेथून स्थानिक प्रशासनास आज कळविण्यात आल्याने तो परिसर सील करुन कंटेन्टमेंट झोन तयार करण्यात आले. सॅनिटायझेशन व औषध फवारणी करण्यात येउन परिसरातील स्थानिकांचे थर्मल स्कॅनिंग सुरु करण्यात आले.
तहसिलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशीकांत वसावे व सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सरदार चौक, इंदिरा नगर व विसरवाडी येथे हजेरी लाउन परिस्थितीची पाहणीकरत नागरिकांना कंटेन्मेंट झोनचे पालन करण्याची समज दिली. संबंधीत रुग्णावर धुळे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. शहरातील नऊ व ग्रामीण भागातील पाच असे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १५ झाली असून शहरी दोन व ग्रामीण एक असे तीन रुग्ण कोरोना संसर्गमुक्त आहेत. ७२ वर्षीय दोन रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरीत १० जण नंदुरबार, धुळे, व्यारा व सुरत येथे उपचार घेत आहेत.