सरदार सरोवर प्रकल्प : पुनर्वसन वसाहतींच्या विकासासाठी 27 कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:21 PM2018-02-05T12:21:15+5:302018-02-05T12:21:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नंदुरबार जिल्हा जिल्हा परिषदेकडून सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या पुनर्वसन गावामधील पंचायतींना 27 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे गेल्या 15-16 वर्षापासून दुरावस्था झालेल्या वसाहती आता विकसित होणार आहे. दरम्यान तालुक्यातील रेवानगर या ग्रामपंचायतीला साडेपाच कोटींचा निधी मिळाल्यानंतर ग्रापचायतीने रविवारी विकास कामांचा शुभारंभ केला.
सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या कुटूंबाचे अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालुक्यातील एकूण 11 वसाहतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. यात देवमोगरा, सरदार नगर, नर्मदानगर, रेवानगर, रोझवा पुनर्वसन, गोपाळपूर पुनर्वसन, तर्हावद पुनर्वसन, वाडी पुनर्वसन, चिकली व वळछील या वसाहतीचा समावेश आहे. या सर्व वसाहती नर्मदा विकास विभागाने नंदुरबार जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्या आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे वर्ग होऊन ही वसाहतींना आता पावेतो निधी दिला नव्हता सहाजिकच विकासाआभावी प्रचंड दुरवस्था झालेली होती. जेव्हा जेव्हा हे प्रकल्पग्रस्त निधीची मागणी करीत होते या दोन्ही यंत्रणा आपल्या ताब्यात नसल्याची सबब पुढे कडून हात जटकत होते. त्यानंतर विस्थापितांनी निधीबाबत वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यासाठी मोर्चे, उपोषण या सारखे हत्यार उपसले होते त्यानंतर जिल्हा प्रशासनाने नर्मदा विकास विभाग व जिल्हा परिषद या यंत्रणांची बैठक बोलावली त्या वेळी नर्मदा विकास विभागाने 27 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव वर्षभर रखडल्यानंतर गेल्या वर्षाअखेरीस हा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. त्यानंतर जिल्हा परिषदेने या ग्रामपंचायतीकडे प्रत्यक्ष निधी दिला आहे. सदर निधी प्राप्त झाल्यामुळे आता या पंचायतीं मधील विकास कामांना चालना मिळणार असून, पंचायती विकासाची काट टाकणार आहे. रेवानगर ग्रामपंचायत वगळता प्रत्येक ग्रामपंचायतीना अडीच ते साडे तीन कोटी वितरित करण्याचे सांगितले.
दरम्यान, रेवानगर ग्रामपंचायतीने रविवारी साडेपाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन उपसरपंच तथा ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष दाज्या पावरा यांच्या हस्ते केले. या वेळी डॉ.कांतीलाल टाटीया, नर्मदा विकास विभागाचे संदीप सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य लाख्या पावरा, पोलीस पाटील रेंज्या पावरा, माजी सरपंच बारक्या पावरा, दृश्या पावरा, लोसरा पावरा, राण्या पावरा, सभलाल पावरा, आपसिग पावरा, लुफिन फाऊंडेशनचे लक्ष्मण खोसे उपस्थित होते.
या निधीतून पंचायतीने अंतर्गत रस्ते, जोड रस्ता, पूल, बसस्थानक, पाणीपुरवठा, शासकीय इमारती दुरुस्ती व सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचे कामे हाती घेतली आहे दरम्यान रेवानगर हे गाव आदर्श आमदार गाव म्हणून ही निवडण्यात आलेले आहे.