निसर्ग आणि पर्यटनाची खाण असलेला सातपुडा उपेक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:11 PM2020-09-27T12:11:36+5:302020-09-27T12:12:28+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर तब्बल दशकभर दबदबा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकास ...

Satpuda, a mine of nature and tourism, is neglected! | निसर्ग आणि पर्यटनाची खाण असलेला सातपुडा उपेक्षितच!

निसर्ग आणि पर्यटनाची खाण असलेला सातपुडा उपेक्षितच!

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर तब्बल दशकभर दबदबा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकास मात्र शोधूनही सापडेनासा झाला आहे. तोरणमाळ विकासाच्या घोषणा, प्रकाशा ते सारंगखेडा तापीतून बारमाही जलपर्यटन, सातपुड्याची हवाई सफर, आदिवासी होळीसाठी प्रसिद्ध काठीचा विकास या घोषणा हवेतच विरल्या. ना निधीची तरतूद झाली नाही योजनांना आकार मिळाला.
नवे मंत्री नव्या पर्यटनाच्या योजना अशी स्थिती जिल्हा निर्मितीपासूनची आहे. आघाडी शासनाच्या काळात जिल्ह्याला तब्बल पाच वर्ष पर्यटनमंत्रीपद मिळाले होते. त्यानंतर भाजप शासनाच्या काळात स्वत: पर्यटनमंत्रीच जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु वर्षानुवर्षाच्या योजनांना नवीन पॉलिश मारण्यासारखी घोषणा करणे या व्यतिरिक्त त्यांच्या काळात काहीही झाले नाही. सारंगखेडाचा चेतक फेस्टीव्हल नावारूपास आला, नंतर शिवसेना आघाडीच्या काळात त्याला देखील ग्रहण लागले. त्यामुळे जिल्ह्यात सद्य स्थितीत एकही नाव घेण्यासारखा पर्यटन प्रकल्प नसल्याची खंत जिल्हावासीयांची आहे.
तोरणमाळची पॅराग्लाईडींग
याठिकाणी रोपवेचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. त्याला ११ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याच भागात पॅराग्लाईडींग, पॅरासोलिन, रोपस्केपींगचे प्रयोगही यशस्वी झाले आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने इतर प्रकल्प तेथे होणे गरजेचे आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आज राणीपूरपासून पुढे तोरणमाळपर्यंत घाटाचा रस्ता आहे. या रस्त्याचे नूतनीकरण व रुंदीकरण होणे अपेक्षित आहे.
तापीतील जलपर्यटन
तापीतील जलविहार प्रकल्पाचेही सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी ए.टी.कुंभार यांनी या संदर्भात प्रस्ताव तयार केला होता. प्रकाशा बॅरेज ते सारंगखेडा बॅरेजच्या दरम्यान तापीत प्रचंड जलसाठा राहणार आहे. या जलसाठ्यात जलविहारासाठी स्वतंत्र बोटी उपलब्ध व्हाव्यात, तापीच्या दुथडी नैसर्गिक सौदर्य फुलविण्यासाठी वृक्षारोपण व उद्याण उभारावे तसेच सारंगखेडा ते तोरणमाळ येथे पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हाव्यात अशा विविध योजनांचा या प्रस्तावामध्ये समावेश आहे. हा प्रकल्पही झाल्यास पर्यटकांसाठी तो अधिक आकर्षित ठरेल.
कारण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या गावाला व एकमुखी दत्ताच्या देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा या गावाला धार्मिक दृष्ट्या तेवढेच महत्त्व आहे. या दोन्ही ठिकाणी बॅरेज प्रकल्प उभे झाल्याने त्याला सौदर्याची जोडही मिळाली आहे.
कला व संस्कृती
नंदुरबार जिल्ह्यातील निसर्ग सौदर्य, येथील संस्कृती, कला, ऐतिहासीक पार्श्वभूमी लक्षात घेता या भागात आंतरराष्टÑीय पर्यटन विकासालाही वाव आहे. येथील आदिवासी संस्कृती ही प्राचीन आहे. या संस्कृतीचे सर्वांनाच आकर्षण आहे. त्यामुळे आंतरराष्टÑीय ख्यातीचे आदिवासी संस्कृती संग्रहालय या भागात उभे राहू शकते.
सातपुड्यातील निसर्ग सौदर्याचा विचार करता त्या भागातही पर्यटकांना आकर्षित करू शकतील, असे अनेक प्रकल्प उभे राहू शकतात. त्यातून या भागातील स्थलांतराचा आणि कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

सातपुड्याचे निगर्स सौंदर्य महाराष्टÑातील माथेरान, महाबळेश्वर, गुजरातमधील सापुतारा या ठिकाणांपेक्षाही तोरणमाळसह इतर स्थानांना अधिक सौदर्य संपदा लाभली आहे. परंतु पायाभूत सुविधांअभावी परिसर दुर्लक्षीत आहे.
या भागात पर्यटन विकासाचे प्रकल्प सुरू झाल्यास देशभरातील पर्यटकांसाठी ते आकर्षित ठरू शकेल. त्यातून स्थानिक लोकांना रोजगारही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होवू शकतो.
सपाटीच्या तापीच्या पट्ट्यापासून ते सातपुड्याच्या शेवटच्या पर्वतरांगेतील नर्मदा खोऱ्यापर्यंत हवाईसफरचाही प्रस्ताव हवेतच राहिला आहे.

Web Title: Satpuda, a mine of nature and tourism, is neglected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.