नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून वाजणार शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:21 PM2020-11-23T12:21:10+5:302020-11-23T12:21:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या अनुषंगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३६२ शाळा साेमवारी सुरू होण्याची चिन्हे असून शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार शाळांमध्ये उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेत शाळांच्या व्यवस्थापन समित्यांनी शाळा सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यास संमती देत गती दिली होती. यांतर्गत गेल्या दोन दिवसात थर्मामीटर, ऑक्सीमीटर, थर्मल गन, जंतुनाशक, साबण खरेदी सुरू असल्याचे दिसून आले होते. बहुतांश ठिकाणी शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. यात पालिका प्रशासनाची मदत घेत निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शाळा सुरू होणार असल्याने शाळेच्या दर्शनी भागावर शारिरीक अंतर, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे इत्यादी संदर्भात मार्गदर्शक असणारे फलक लावले जात आहेत. शाळेतील वर्गखोली तसेच स्टाफ रूम मधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतराच्या नियमांनुसार करण्याचे आदेश असल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान एका बाकावर एक विद्यार्थी बैठक व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकीकडे ही सर्व तयारी सुरू असताना शासनाकडून रात्रीतून निर्णय आल्यास बदल करण्याचीही तयारी शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालय व शाळा सुरू होणार असल्याबाबत पालकांना मोबाईलद्वारे सूचित करण्यात येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सोमवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती काही शाळांकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण ८४ माध्यमिक तर ७८ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील एकूण १ लाख ९८ हजार विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने या वर्गांमध्ये २४ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून जोडले गेले असल्याची माहिती आहे.