दुर्गम भागातील तिनसमाळला भरली झाडाच्या फांदीवरती शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:13 PM2020-07-19T12:13:30+5:302020-07-19T12:13:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ...

A school on a branch of a tree in a remote area | दुर्गम भागातील तिनसमाळला भरली झाडाच्या फांदीवरती शाळा

दुर्गम भागातील तिनसमाळला भरली झाडाच्या फांदीवरती शाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या संकटामुळे शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शासकीय शाळांसह खाजगी शाळांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र जेथे मोबाईलची रेंज नाही, शाळा नाही अशा धडगाव तालुक्यातील तीनसमाळ येथील अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गावातील एका शिक्षित युवकाने चक्क झाडांच्या फांद्यावर शाळा भरवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवराच्या पाणलोट क्षेत्रा जवळील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तिनसमाळ, रोषमाळ ही आदिवासीबहुल गाव व पाडे. एकीकडे नर्मदा नदीचा अथांग जलाशय तर दुसरीकडे घनदाट जंगल. या ठिकाणी जायला पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराने अपूर्ण काम केले असून, निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याने हा रस्ता गावकऱ्यांसाठी तसा कुठलाही फायद्याचा नाही असे, असताना या गावात कुठल्याही शासकीय सुविधा नाही. साधी जिल्हा परिषदेची शाळा नाही, अशा परिस्थितीत येथे राहणाºया विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी गावातील युवक लक्ष्मण पावरा याने अनोखी शक्कल लढविली आहे.
स्मार्ट फोन आहे, मात्र मोबाईलची रेंज नसल्याने हा फोन काहीच कामाचा नाही. परिणामी इंटरनेट सुविधा मोबाईलवर उपलब्ध असतानाही त्याचा उपयोग होत नाही. मोबाईलला रेंज मिळाल्याशिवाय इंटरनेट चालणार नाही यासाठी त्याने उंच डोंगरावर जाऊन झाडांच्या फांद्यावर विद्यार्थ्यांची शाळा भरविण्याचा उपक्रम गेल्या दोन महिन्यापासून सुरू केला आहे. त्याच्या या उपक्रमास गावातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभत असून, विद्यार्थीही आपल्या या मास्तराचे व त्याने राबविलेला अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत असून, मन लावून अध्ययन करत आहेत.
दररोज सकाळी न चुकता लक्ष्मण गावातील विद्यार्थ्यांना एकत्रित करतो. सुमारे दीड ते दोन किलोमीटर अतिदुर्गम भागात उंच डोंगरावर घनदाट जंगलात पायपीट केल्यानंतर एका उंच झाडावरील फांद्यांवर मोबाईलची रेंज मिळाल्यानंतर तेथे हे शाळेचे कामकाज सुरू होते. मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम डाऊनलोड केल्यानंतर लक्ष्मण हा अगदी सोप्या व विद्यार्थ्यांना पटकन समजेल अशा मातृभाषेत त्यांना शिकवत असतो यामुळे विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, इंटरनेट, आॅनलाईन शिक्षण, इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यासक्रमाचे विविध प्रकार याची माहिती मिळत असून, विद्यार्थ्यांनाही आता याची गोडी लागली असल्याने सुरूवातीला चार ते पाच विद्यार्थ्यांची भरणारी ही शाळा आता २० ते २५ पट संख्येची झाली आहे. विशेष म्हणजे शिक्षक लक्ष्मण व सर्व विद्यार्थी हे उंच झाडावरील फांद्यावर बसून दोन ते तीन तास नियमित अभ्यास करीत आहेत.
नर्मदा नदीवरील सरदार सरोवरमुळे धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील अनेक गावे बुडीत क्षेत्रात आली असल्याने त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मात्र तिनसमाळ या गावाची व्यथा अनोखी आहे. घनदाट जंगल व शेजारी विशाल जलाशय असल्यामुळे या गावातील एकही घर बुडालेले नाही मात्र या गावाचे आता पुनर्वसन करणे आवश्यक झाले आहे गेल्या आठ ते १० वर्षांपासून या गावातील नागरिकांनी स्वत:हून शासनाला सांगितले की, आमचे पुनर्वसन करा. मात्र अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. परिणामी येथील गावकऱ्यांना नियमितपणे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
लक्ष्मण पावरा हा औरंगाबाद येथे समाजशास्त्र विषयाचे शिक्षण घेत आहे. कोरोना व लॉकडाऊन जाहीर झाल्याने तो औरंगाबाद येथून आपल्या गावी आला. गावी आला तर त्याने पाहिले आपल्या गावातील विद्यार्थ्यांना कुठलीही शैक्षणिक सुविधा नाही. आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय असला तरी मोबाईलची रेंज ही मुख्य अडचण आहे. यावर त्याने सर्वप्रथम स्वत: उपाय शोधला. त्याबद्दल गावकºयांनी याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना गोळा केले व झाडाच्या फांद्यांवर अनोखी शाळा सुरू केली. आजपर्यंत शाळांचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. अगदी साखर हंगामात ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून साखर शाळा सुरू करण्यात येतात. कुठे कुठे वस्तीशाळा सुरू आहे तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या शाळा सुरू आहे. मात्र लक्ष्मणने सुरू केलेली झाडाच्या फांद्यांवरील शाळा ही अनोखी ठरली आहे.

Web Title: A school on a branch of a tree in a remote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.