विसरवाडीतील ५०० घरांचे आरोग्य विभागाकडून स्क्रिनिग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:33 PM2020-07-21T12:33:34+5:302020-07-21T12:35:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील एका ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे़ प्रशासनाने ही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील एका ५२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे़ प्रशासनाने ही माहिती विसरवाडी येथे दिल्यानंतर तातडीने आरोग्य विभागाच्या पथकाने याठिकाणी भेटी देत ५०० घरांची स्क्रिनिंग केली़ विसरवाडी येथे यापूर्वीही ५२ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर दक्षता पाळण्यावर भर देण्यात येत आहे़
विसरवाडी येथील कोरोनाबाधित व्यक्ती गेल्या १० दिवसांपासून धुळे येथे रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे़ विसरवाडी येथील मस्जिद गल्लीत संबधितांचा रहिवास आहे़ यामुळे आरोग्य व महसूल विभागाकडून हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करुन सील केला गेला आहे़ दरम्यान बाधिताच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ विसरवाडी येथे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत असून ४० गावांची बाजारपेठ असल्याने याठिकाणी सतत नागरिकांची गर्दी असते़ यात आठवड्याच्या आतच दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ विसरवाडी हे गाव महामार्गावर असून याठिकाणी नवापूर तालुक्याच्या विविध भागातून नागरिक बाजार करण्यासाठी येतात़ यात कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ विसरवाडी परिसरात यापूर्वी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्यासह त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करताना प्रशासनाची दमछाक झाली होती़ यामुळे विसरवाडी गावात दुसरा रुग्ण समोर आल्यानंतर तातडीने घरांचे स्क्रिनिंग करण्यावर भर देण्यात आला़ यासाठी केवळ दोन तासात आरोग्य पथके पाठवून घरोघरी माहिती घेत त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे़ आरोग्य प्रशासनाच्या या रॅपिड कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे़
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे,पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता जाधव, डॉ. शितलकुमार पाडवी आशा गटप्रवर्तक अंजना गावित, सुमित्रा गावित यांनी याठिकाणी भेटी देत महिला आणि पुरूषांसोबत संवाद करत माहितीचे संकलन केले़