दुसऱ्या फेरीतही नंदुरबार जिल्हा मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:32 PM2019-03-26T19:32:48+5:302019-03-26T19:32:54+5:30
आरटीई : जिल्ह्यातून केवळ ४२१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल
नंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेश (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातून ४७० जागांसाठी केवळ ४२१ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत़ पहिल्या फेरीपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात राज्यात ‘सेकंड लास्ट’ असलेला नंदुरबार जिल्हा दुसऱ्या फेरीत शेवटी फेकला गेला असल्याचे दिसून येत आहे़ ३० मार्चपर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश करण्याची मुदत पालकांना देण्यात आलेली आहे़
जिल्ह्यात एकूण ४७ शाळांच्या माध्यमातून ४७० जागांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे़ यांतर्गत आतापर्यंत जिल्हाभरातून केवळ ४२१ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पैकी, ४२० अर्ज आॅनलाईन पध्दतीने तर एक अर्ज मोबाईल अॅप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेला आहे़ पहिल्या प्रवेश फेरीपर्यंत राज्यात सर्वाधिक पिछाडीवर असलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्याने नंदुरबारला मागे टाकले आहे़ सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ३५३ आरटीई जागांसाठी एकूण ५१० आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़
खान्देशात जळगाव आघाडीवर
जळगाव, धुळे व नंदुरबारचा विचार करता आरटीई प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज सादर करण्यामध्ये जळगाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे़ जळगावात एकूण २७४ शाळांमार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ एकूण ३ हजार ७१७ जागांपैकी ६ हजार २२८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर १७ अर्ज मोबाईल अप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेले आहेत़ अशा प्रकारे एकूण ६ हजार २४५ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ धुळ्यात ९७ शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी १ हजार २३७ जागांसाठी २ हजार ९१ आॅनलाईन अर्ज व ५ अर्ज मोबाईल अॅप्लीकेशनव्दारे असे एकूण २ हजार ९६ अर्ज दाखल झालेले आहे़
इतर आदिवासी जिल्हे नंदुरबारच्या पुढेच
आरटीई प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत इतर अनेक आदिवासी तसेच मागास जिल्हे पुढे असल्याचे दिसून येत आहे़ गडचिरोलीत ८२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ तेथे एकूण ७८४ जागांसाठी १ हजार २७ इतके आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पालघर जिल्ह्यात एकूण २२२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़
एकूण जागार ४ हजार २५२ असून त्यासाठी १ हजार १६८ अर्ज दाखल झालेले आहेत़ यवतमाळ जिल्ह्यात १९६ शाळांच्या माध्यमातून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून एकूण जागा १ हजार ७४४ आहेत़ यासाठी तब्बल ४ हजार ४८७ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़
अर्जांची छाननी प्रक्रिया...
अद्याप पालकांकडून आॅनलाईन पध्दतीने आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे़ यासाठी मुदत वाढवून ती ३० मार्च करण्यात आलेली आहे़ या तारखेपर्यंत आलेल्या एकूण अर्जांची व सोबतच्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी करण्यात येणार आहे़ यातून अनेक प्रस्ताव त्रुटींमुळे रिजेक्ट होण्याचीदेखील शक्यता असते़ त्यामुळे आधीच कमी आलेले प्रस्ताव व त्यात त्रुटींमुळे रिजेक्ट होणारे प्रस्ताव यामुळे परिणामी यंदाही आरटीईच्या जागा रिक्त राहणार की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़
मागील वर्षी आरटीईअंतर्गत जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला चार प्रवेश फेºया घेण्याची वेळ आली होती़ तरीदेखील मागील वर्षी एकूण १३७ आरटीईच्या जागा शिल्लक होत्या़ तेच आताही होतय की काय अशी भिती शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार वेळापत्रकात बदल, तारखांचा घोळ आदी सावळा गोंधळ झाला होता़ तसेच आरटीई प्रवेशासाठी अनेकांकडून लॉबिंगदेखील सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़