नवापूर तालुक्यात 12 लाख रुपयांचे लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:48 PM2019-06-08T12:48:28+5:302019-06-08T12:48:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील वावडी गावात दोन घरांच्या झडतीत सुमारे 12 लाख रुपये किमतीचे खैर, शिसम व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील वावडी गावात दोन घरांच्या झडतीत सुमारे 12 लाख रुपये किमतीचे खैर, शिसम व साग प्रजातीचे अवैध तोडीचे साठवून ठेवलेले लाकूड वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्तथरारक पद्धतीने छापा टाकून जप्त केले.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल आर.बी. पवार यांनी नंदुरबार, नवापूर व चिंचपाडा वनविभागातील कर्मचा:यांनी नवापूर तालुक्यातील वावडी गावात दोन घरांवर धाड टाकून झडती घेतली. त्यात ताज्या तोडीचे अवैधपणे साठवून ठेवलेले खैर, शिसम व साग प्रजातीचे लाकूड साठा जप्त केला. लाकडाचा एवढा मोठा साठा प्रथमच ताब्यात घेण्यात आल्याने लाकूडचा साठा नवापूर येथील काष्टआगारात आणण्यासाठी दोन टेम्पो व चार पिकअप जीपचा वापर करावा लागला. जप्त केलेल्या मालाची अंदाजित किंमत सुमारे 12 लाख रुपये असावी असा अनुमान आहे. वनविभागाच्या कारवाईदरम्यान शेकडोंचा जमाव एकत्रित झाल्याने चित्तथरारक पद्धतीने लोकांच्या जमावातून वाहनात माल भरून मुद्देमाल नवापूर काष्टआगारात जमा करण्यात वनविभागास यश आले. वावडी गावात प्रथमच अशी धाडसी कारवाई करण्यात आली. आजर्पयतची ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याने वनविभागाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
या कारवाईत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, चिंचपाडा वनक्षेत्रपाल आर.बी. पवार, वनपाल प्रकाश मावची, संजय पाटील, युवराज भाबड, डी.के. जाधव, वनरक्षक अरविंद निकम, भूपेश तांबोळी, कल्पेश अहिरे, एस.डी. बडगुजर, एन.आर. पाटील, अशोक पावरा, एन.टी. थोरात, कमलेश वसावे, प्रशांत सोनवणे, प्रतिभा बोरसे, रेखा गिरासे, आरती नगराळे, दिपाली पाटील, वाहन चालक एस.एस. तुंगार, माजी सैनिक विशाल शिरसाठ, नाना पिंपळे, एस.व्ही. मोरे, आर.एस. कासे यांच्यासह वनमजूर व कर्मचारी सहभागी झाले.
याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत शिसम व खैर लाकूडचे मोठे नग व इतका साठाच नसल्याने हे लाकूड गुजरात राज्यातून आणण्यात आल्याचा कयास लावला जात आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून चिंचपाडाचे वनक्षेपाल आर.बी. पवार यांनी प्रथम अहवाल जारी केला आहे.