तीन दिवसात खड्डे भरून फोटो पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 12:46 PM2020-12-22T12:46:38+5:302020-12-22T12:46:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहादा ते धुळे या हमरस्त्यावरील सारंगखेडा गावानजीकच्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत ...

Send photos by filling the pits in three days | तीन दिवसात खड्डे भरून फोटो पाठवा

तीन दिवसात खड्डे भरून फोटो पाठवा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  शहादा ते धुळे या हमरस्त्यावरील सारंगखेडा गावानजीकच्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने प्रांताधिकाऱ्यांना स्वत: त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी लागली. त्यावर  जिल्हाधिकाऱ्यांनी संतप्त होत तीन दिवसांत खड्डे भरून सुस्थितीतील रस्त्याचे फोटो पाठविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. आतातरी रस्ता वाहतुक योग्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होणे, वाहतूक जाम होणे, खड्ड्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोणता खड्डा टाळायचा याचा शोध घेणे हे चालकांना अशक्य झाले आहे. खड्डा टाळण्याचा नादात सातत्याने अपघात होत असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यावर किरकोळ कामे करून लाखोंचे बिल काढले जात असल्याची चर्चा आहे. 
या रस्त्याचा अनुभव आजी व माजी मंत्री, खासदार, आमदार यांनी ही घेतले तरी रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मात्र प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांनी पुलावरील खड्ड्यांचा अनुभव घेऊन खड्डा बुजविण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवूनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. शेवटी यात्रोत्सवानिमित्त झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचेकडे केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संवाद साधत तीन दिवसांत हे खड्डे बुजविण्यात यावे व काम पूर्ण झाल्याचे फोटो मला पाठवावेत, असे आदेशित केले. त्यामुळे येत्या तीन दिवसांत हे खड्डे भरले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सारंगखेडा येथे तापी नदीवर पूल आहे. हा पूल सुमारे ७०० मीटर लांबीचा आहे. याठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे अंतर पार करण्यासाठी वाहनाला दहा मिनिटांहून अधिक वेळ लागतो. याबाबत परिसरातून वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र कुंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रे संदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड अध्यक्षस्थानी होते. बैठकीत यात्रे संदर्भात चर्चा होत असतानाच उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांनी सारंगखेडा पुलावरील खड्ड्यांसंदर्भात तक्रार केली व दुरुस्तीबाबत विनंती केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत डॉ.भारुड यांना प्रत्यक्ष बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागला. 
गत पाच महिन्यांत या पुलावरील रस्ता दुरुस्तीची कामे वेळोवेळी झाली असताना खड्डे पुन्हा जागा घेत असल्याने या कामांचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच शहादा-सारंगखेडा रस्त्यावरही खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. मात्र तेथील डांबरही विभागात झिरपत असल्याने दोन महिन्यांत या रस्त्यावर पुन्हा खड्डे दिसतील, अशी अवस्था आताच दिसून येत आहे.

Web Title: Send photos by filling the pits in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.